Lonar Lake declared as 'Ramsar' wetland, second in Maharashtra after Nashik | लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित 

लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित 

अमरावती : बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्टातून घोषित झालेले दुसरे ‘रामसर’ स्थळ आहे.


ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. आतापर्यंत जगात २२०० पाणथळ स्थळ असल्याची नोंद आहे. ‘रामसर’ संकेस्थळावर ११ नाेव्हेंबर २०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. हल्ली लोणार खाऱ्या पाण्याचे तळे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असून, त्याचे नियंत्रण त्यांच्याचकडे आहे. लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांनी ट्विट करून वनखात्याचे कौतुक केले.


आकाशातील उल्कापातामुळे तयार झाले लोणार सरोवर

लोणार अभयारण्य हे ८ जून २००० साली निर्माण करण्यात आले. ३६५.१६ हेक्टर परिसरात एवढे क्षेत्र असून, ७७.६९ हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर जागतिक कीर्तीचे ठरले आहे. ‘रासमर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय करार होण्याची दाट शक्यता आहे.

लोणार सरोवरला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाला, ही राज्यासाठी बहुमानाची बाब आहे. लोणार सरोवर संदर्भात प्रस्ताव पाठविला होता. वर्षभरातच लोणारला ‘रामसर’ ही मोठी उपलब्धी मिळाली आहे.

- एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.

श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने लोणार सरोवर परिसर पावन झाल्याची धारणा या भागातील नागरिकांमध्ये असून लोणार सरोवर परिसराची जवळपा सव्वा महिना त्यांनी तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका येथे सांगितल्या जाते. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील श्रीराम वनगमन संस्थेच्या सदस्यांशी संशोधनाच्या दृष्टीने लोणार येथे दोन वर्षापूर्वी भेट दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
यास लोणार येथील सरोवर अभ्यासक तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुरेश मापारी यांनीही दुजोरा दिला आहे. यापूर्वी २० नोव्हेंबर २०१८ मध्ये या संस्थेनेने लोणार येथे भेट दिली होती, अशी माहिती मापारी यांनी दिली. लोणार सरोवर परिसरातील माहिती या भागात प्रचलीत असलेल्या कथांच्या संदर्भानेही त्यांनी या समितीला माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपुजन पाच आॅगस्ट रोजी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोणार संदर्भात माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
दरम्यान, लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. संक्दपुराण, पद्मपुराण, रायमायणासारख्या ग्रंथातून लोणारचे सरोवर हे कृतयुगामध्ये निर्माण झाल्याचे संदर्भ येतात, असे सांगण्यात येते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lonar Lake declared as 'Ramsar' wetland, second in Maharashtra after Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.