‘लोकमत’ची भूमिका ठरली ‘लोकचळवळ’
By Admin | Updated: September 28, 2015 21:32 IST2015-09-28T21:32:10+5:302015-09-28T21:32:10+5:30
सातारा : गावोगावी नागरिकांच्या उठावातून डॉल्बीमुक्त विसर्जन

‘लोकमत’ची भूमिका ठरली ‘लोकचळवळ’
सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता तर्कसुसंगत सुस्पष्ट विचार, ठाम भूमिका, सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि खुली संवादप्रक्रिया अशा टप्प्यांनी ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!
गेल्या वर्षी डॉल्बीमुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे असे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करून ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. पहिल्या दिवसापासूनच मिळालेला प्रतिसाद पाहता लोकभावना नेमकी काय आहे, हे सर्वांनाच उमगत गेले. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि अनेक गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून गावागावांत बैठका झाल्या.
अशातच तीव्र दुष्काळाची छाया राज्यासह जिल्ह्यावरही पसरली. गणेशोत्सवात पैशांची उधळपट्टी न करता दुष्काळग्रस्तांना हात द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले. पोलीस प्रशासनानेही या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहने केली. शहरासह जिल्ह्यात अनेक ढोलपथके नव्याने स्थापन करून तरुणांनी कसून सराव सुरू केला.
डॉल्बीला परवानगीवरून कोर्टकचेऱ्या झाल्या; मात्र तोपर्यंत नागरिकांचा निर्णय पक्का झाला होता. शेवटच्या टप्प्यात ‘लोकमत’च्या कार्यालयात परिचर्चा घेण्यात आली. डॉल्बीमालकांच्या प्रतिनिधीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी, विधीज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, महिला प्रतिनिधी, मंडळांचा प्रतिनिधी, ढोलपथकांचा प्रतिनिधी असे दहा समाजघटक ‘लोकमत’ने एका टेबलवर आणले. यावेळी झालेल्या चर्चेच्या वार्तांकनातून डॉल्बीच्या सर्वच अंगांवर प्रकाशझोत पडला. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन नागरिकांनी शिस्तबद्धतेत आनंद शोधला आणि त्यांना तो भरभरून मिळालाही! (प्रतिनिधी)
‘लोकमत’ ने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला. यामुळे वाचकांमध्येच एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली. सार्वजनिक गणेश मंडळे व जनता यांनीच स्वत:हून या चळवळीला साथ दिली. त्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले. जनतेला सुखाने राहता आलं पाहिजे, ही जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. सातारा शहरातील २५ तर संपूर्ण जिल्ह्यातील १00 क्षेत्रे शांतता क्षेत्र म्हणून आम्ही जाहीर केली होती. यातून ४00 ते ५00 डेसिबलपर्यंत जाणारे ध्वनीचे आवाज कमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेने अत्यंत चांगले काम केले.
- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी
चार स्पीकर, दोन ‘बास’
साताऱ्यातील मिरवणुकीत डॉल्बी अभावानेच दिसत होती. मुख्य मिरवणुकीत ज्यांनी डॉल्बीचा वापर केला, त्या मंडळांनीही केवळ चार स्पीकर आणि दोन ‘बास’ किंवा ‘बेस’चा वापर केला. त्यामुळे डॉल्बीचा आवाज आपोआपच मर्यादित राहिला. मुख्य मिरवणुकीतून डॉल्बीच्या भिंती गायब होऊन जास्तीत जास्त
सात स्पीकर पाहायला मिळाले.