LMOTY 2019: उद्योग क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल बाबा कल्याणींचा लोकमतकडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:36 IST2019-02-20T21:36:21+5:302019-02-21T15:36:08+5:30
ऑटोमोबाईल क्षेत्रातलं आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या बाबा कल्याणी यांचा लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला आहे.

LMOTY 2019: उद्योग क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल बाबा कल्याणींचा लोकमतकडून सन्मान
मुंबई: ऑटोमोबाईल क्षेत्रातलं आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या बाबा कल्याणी यांचा लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुट्टे भाग महत्त्वाची भूमिका बजावतात. कल्याणी यांची भारत फोर्ज कंपनी मोठ्या वाहनांसाठी लागणारे सुट्या भागांची निर्मिती करते. भारत फोर्जला जागतिक क्षितिजावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव लोकमतनं आज केला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाबा कल्याणी यांनी 1972 मध्ये भारत फोर्जमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कल्याणी यांनी ही कंपनी जागतिक स्तरावर नेली. भारतामधून ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित ज्या सुट्ट्या भागांची निर्यात होते, त्यात भारत फोर्जचा वाटा लक्षणीय आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. पुण्यात त्यांच्याकडून प्रथम पुणे शिक्षण संस्था चालवली जाते. 2000 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेनं आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मुलांना शिक्षण देण्याचं मोलाचं कार्य केलं आहे.
देशाच्या जडणघडणीत उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असतो. देशाचा सुपरफास्ट विकास करायचा असल्यास वाहतुकीची उत्तम साधनं गरजेची असतात. हीच गरज ओळखून कल्याणी यांनी भारत फोर्जच्या माध्यमातून या क्षेत्रात भारताला अग्रस्थान ठेवलं. त्यांच्या याच कार्याचा आज लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर या सोहळ्याचं हे सहावं वर्ष आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.