मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात होणारी जुगलबंदी आपण अनेकदा पाहिली आहेच. विरोधकांच्या अडचणीत आणणाऱ्या अनेक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाक्-चातुर्याने उत्तर देत असतात. आज 'लोकमत'च्या महासोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत घेत आहेत.या मुलाखतीच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी 'वर्षा' बंगल्यावर रहाया जाण्यावरुन प्रश्नाची सुरुवात केली. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहायला जाण्याची तारीखच सांगितली.
महायुतीचे नवीन सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले आहेत. पण, अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर रहायला गेलेले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरू आहेत. यावरुन आज जयंत पाटील यांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांना 'वर्षा' बंगल्यावर तुम्ही रहायला कधी जाणार आहात? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी फडणवीस यांनी तारीखच सांगितली.
पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सीएम फडणवीस म्हणाले, हा प्रश्न काही जणांना उगाच पडलाय आणि काही लोकांना मनापासून पडला आहे. मी एप्रिल महिन्यामध्ये 'वर्षा'वर जाईल. २७ मार्च रोजी माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपणार आहे, त्यानंतर मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर जाणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळातील तुमचे लाडके मंत्री कोण, असाही प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आता लाडका मंत्री योजना जाहीर केल्याचं मिश्किलपणे सांगतले.