मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक प्रश्नांची 'परफेक्ट' उत्तरं देताना आपण पाहिलं आहे. विधिमंडळात विरोधकांच्या अडचणीत आणणारे प्रश्न असोत किंवा पत्रकारांचे थेट सवाल. देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकाला वाक्-चातुर्यानं उत्तर देत असतात. आता 'मिस्टर परफेक्ट' मुख्यमंत्री हे बॉलीवूडच्या 'मिस्टर फरफेक्शनिस्ट' आमीर खानच्या टोकदार प्रश्नांना सामोरे जाणार आहेत. 'लोकमत'च्या महासोहळ्यात ही 'परफेक्ट' जुगलबंदी रंगणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत बॉलीवूड अभिनेते आमीर खान घेणार आहेत. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात ही महामुलाखत होणार आहे. एक कलाकार हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. त्यात आमीर खानसारखा हरहुन्नरी अभिनेता राजकारणातील एका डॅशिंग व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेणार असल्यानं ही मुलाखत या पुरस्कार सोहळ्याचं खास आकर्षण ठरणार आहे. कारण एका बाजूला आयुष्य कितीही 'आऊट ऑफ कंट्रोल' झालं तरी 'ऑल इज वेल'चा मंत्र देणारा 'रँचो', तर दुसऱ्या बाजूला राज्याची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती 'ऑल इज वेल' ठेवण्याची जबाबदारी खांद्यावर असणारे 'देवाभाऊ', हे कला आणि राजकारणातील दोन दिग्गज या मुलाखतीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार म्हणजे प्रश्नोत्तरांची 'दंगल' तर घडणारच!
महाराष्ट्राच्या विकासाची पुढील दिशा आणि आगामी योजनांवर मुख्यमंत्र्यांचं व्हिजन यानिमित्ताने कळू शकेल. पण महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती आणि आव्हानं तसंच जलयुक्त शिवार असो किंवा पाणी फाऊंडेशनचं काम, आमीर खान आणि फडणवीस यांच्यातील संवाद सामाजिक परिवर्तनावर प्रकाश टाकणारा ठरू शकेल. एक राजकारणी आणि एक अभिनेता यांच्यातील या गप्पांमधून मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अपरिचित पैलू समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुलाखत पाहणं रंजक ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा समजला जाणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे होणार आहे. हा सोहळा लोकमतच्या यू-ट्युब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येईल. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना या सोहळ्यात 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Web Summary : Chief Minister Devendra Fadnavis will be interviewed by actor Aamir Khan at the Lokmat Maharashtrian of the Year award ceremony. This conversation promises insights into Maharashtra's development, challenges, and social change initiatives. The event will honor individuals for outstanding contributions across various sectors.
Web Summary : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का साक्षात्कार अभिनेता आमिर खान लेंगे। यह बातचीत महाराष्ट्र के विकास, चुनौतियों और सामाजिक परिवर्तन पहलों में अंतर्दृष्टि का वादा करती है। कार्यक्रम विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट योगदान के लिए व्यक्तियों को सम्मानित करेगा।