कौशल्य विकास आणि बौद्धिक भांडवलाच्या बळावर महासत्तेचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:53 IST2025-08-26T13:52:07+5:302025-08-26T13:53:00+5:30
Lokmat Global Economic Convention London 2025: महिला सक्षमीकरण आणि बौद्धिक भांडवलावर भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने जाईल, असा दृढ विश्वास लंडनमध्ये ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या पहिल्या चर्चासत्रात उद्योग, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील धुरिणांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास आणि बौद्धिक भांडवलाच्या बळावर महासत्तेचे स्वप्न
लंडन - महिला सक्षमीकरण आणि बौद्धिक भांडवलावर भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने जाईल, असा दृढ विश्वास लंडनमध्ये ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या पहिल्या चर्चासत्रात उद्योग, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील धुरिणांनी व्यक्त केला.
‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी संचलित केलेल्या या परिसंवादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अजित गोपछडे, हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रेंजर, बँकर अमृता फडणवीस, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाब्रिया, ‘प्रवीण मसाले’चे संचालक विशाल चोरडिया, डी. वाय. पाटील ग्रुपचे चेअरमन अजिंक्य डी.वाय. पाटील, सीए अभय भुतडा, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिलचे चेअरमन किरीट भन्साळी सहभागी झाले होते. योग्य गुंतवणुकीच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था लवकरच होऊ, असा विश्वास प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केला.
मंगल प्रभात लोढा, लॉर्ड रामिंदर रेंजर, अभय भुतडा, अमृता फडणवीस, विशाल चोरडिया, डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, किरीट भन्साळी यांनी पुढील १० वर्षांत भारत नेतृत्वाच्या ताकदीवर पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
रामदास आठवले म्हणाले, २०४७ मध्ये भारत स्वतंत्रतेची १०० वर्षे पूर्ण करेल आणि तेव्हा भारत जगात पहिल्या क्रमांकावर यावा, हे मोदींचे स्वप्न आहे. जपानला भेट दिली, तिथे कामगाराला मालक आणि मालकाला कामगाराची भूमिका कळते, असे नातेसंबंध कार्पोरेटने दृढ करावेत. वैद्यकीय क्षेत्राने, शास्त्रज्ञांनी क्षमता सिद्ध केली. याच बळावर वैद्यकीय क्षेत्रसुद्धा ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेत भर टाकेल, असा विश्वास डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केला.