‘लोकमत’ पुरस्काराने आमदारांचा गौरव!
By Admin | Updated: August 5, 2016 06:59 IST2016-08-05T05:48:07+5:302016-08-05T06:59:46+5:30
लोकमत विधिमंडळ पुरस्काराचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

‘लोकमत’ पुरस्काराने आमदारांचा गौरव!
मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अभ्यासू आमदारांना पुरस्कृत करणारा लोकमत विधिमंडळ पुरस्काराचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ^^‘लोकमत’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा,
‘लोकमत’चे एडिटर इन चिफ माजी मंत्री
राजेंद्र दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राज्याचे अनेक मंत्री, आमदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्नेहमयी उपस्थितीत हा समारंभ साजरा झाला. आर.आर. पाटील फाउंडेशन प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्काराने आम्हाला अधिक चांगले संसदीय कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना भरगच्च सभागृहाच्या साक्षीने विजेत्यांनी व्यक्त केली.
लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, आ. सुमनताई पाटील यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन समूह संपादक दिनकर रायकर यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)
>जीवनगौरव अन् अभिवादन
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि दहाव्यांदा विधानसभेचे सदस्य असलेले गणपतराव देशमुख आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन व्यक्ती पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आल्या तेव्हा संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटाद्वारे त्यांना अभिवादन केले. संसदीय लोकशाहीचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे गणपतराव देशमुख यांचा हातात हात घेऊन काही क्षण उभे होते तेव्हाही सभागृहातील वातावरण भारावून गेले.
>पुरस्काराने जबाबदारीची जाणीव वाढेल : मुख्यमंत्री
प्रत्येक पुरस्काराने जबाबदारीची जाणीव वाढतच असते. त्यातच ‘लोकमत’सारख्या महत्त्वाच्या वृत्तपत्र समूहाने दिलेल्या पुरस्काराचे मोल कितीतरी अधिक आहे. मी इथे पुरस्कार देण्यासाठी आलो होतो; पण मला पुरस्कार देऊन सरप्राइज मिळाले, अशी आनंदाची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. लोकमतच्या लाखो वाचकांच्या पसंतीची मोहर या पुरस्कारावर उमटलेली होती.
>पुरस्काराचे मानकरी
जीवनगौरव :
शिवाजीराव देशमुख (विधान परिषद), गणपतराव देशमुख (विधानसभा)
लोकमत रिडर्स चॉईस पुरस्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उत्कृष्ट नवोदित आमदार
अतुल भातखळकर
(विधानसभा-भाजपा),
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी).
उत्कृष्ट महिला आमदार डॉ.नीलम गोऱ्हे (विधान परिषद- शिवसेना), वर्षा गायकवाड (विधानसभा-काँग्रेस)
अभ्यासू वक्ता आमदार
धनंजय मुंडे (विधान परिषद, राष्ट्रवादी), प्रकाश आबिटकर (विधानसभा-शिवसेना).