भाजपला २७१ जागा मिळल्यास आनंदच : राम माधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:04 IST2019-05-06T16:02:48+5:302019-05-06T16:04:32+5:30
भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे.

भाजपला २७१ जागा मिळल्यास आनंदच : राम माधव
नवी दिल्ली - सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापासून दूर राहिल अशी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अरुण जेठली भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवले असं सांगत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला देखील लोकसभा निवडणुकीत नुकसान होण्याची चिंता सतावत असल्याचे समजते. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राम माधव बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. राम माधव म्हणाले की, भाजपला उत्तर भारतात नुकसान होण्याची शक्यता आहे. या भागात भाजपने २०१४ मध्ये विक्रमी कामगिरी केली होती. मात्र पूर्वोत्तर भारतातील ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला मदत होईल, असंही ते म्हणाले.
भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आम्ही विकासाची धोरणे पुन्हा राबवू. यावेळी माधव यांनी पाकिस्तानचा मुद्दा देखील छेडला. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी एका महिन्याचा कालावधी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान भाजपला स्वत:च्या बळावर बहुमतापर्यंत पोहचण्याविषयी माधव यांनी चिंता व्यक्त केल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी देशात २०१४ पेक्षा मोठी लाट असल्याचे म्हटले होते. परंतु, माधव यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे भाजपमध्ये अस्वस्थता तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.