कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला
By Admin | Updated: August 2, 2016 05:31 IST2016-08-02T05:31:39+5:302016-08-02T05:31:39+5:30
कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरला

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला
डोंबिवली : कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरल्याने सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेमार्गावरील लोकलसेवा कोलमडली. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून मुंबईकडे होणारी धिम्या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
रविवारी मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पारसिक बोगद्यापाशी रुळांवर माती जमा झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलमडली होती. सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे रेल्वे सेवा बाधित असण्याच्या शक्यतेने प्रवाशांनी वेळेअगोदरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, लोकल अवघ्या १० मिनिटे लेट असल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
कल्याण स्थानकातून सीएसटीकडे जाण्याकरिता ही लोकल निघाली, त्याच वेळी डबा रुळांवरून घसरताच गाडीतील काही प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या टाकल्या. गाडीने वेग घेतला नसल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले नाही. लोकल घसरल्यानंतर घटनास्थळी रोड अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनचे (एआरटी) पथक पोहोचले. त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील फलाट क्र. १ आणि १ एची वाहतूक बंद करण्यात आल्याने ठाकुर्ली स्थानकातून कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या फलाट क्र.४/५ वर वळविण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे उपनगरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती पथकाला घसरलेला डबा तेथून हलविण्यात अनंत अडथळे आले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पाऊण तास ते एक तास विलंबाने सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. (प्रतिनिधी)
>दुपारी १२.२० च्या सुमारास घसरलेला लोकलचा डबा पुन्हा रूळांवर घेण्यात यश आले. त्यानंतर, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सीएसटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर, तासाभराने दुपारी २.१२ च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची चौकशी सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
सोमवारी सकाळीच ७.२० च्या सुमारास खर्डी स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाला होता. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनही त्यामुळे उशीरा धावल्या. परिणामी, या मार्गावरील हजारो प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले.