‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 23:55 IST2025-12-23T23:54:37+5:302025-12-23T23:55:02+5:30

Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray: पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांनी टोमणे मारण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून बघावे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला.

Local Body Election: 'Mumbai is the goose that lays golden eggs for Uddhav Sena', Eknath Shinde's criticism | ‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  

‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  

मुंबई - पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांनी टोमणे मारण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून बघावे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला शिंदेसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नगर परिषदांच्या निकालांमधून शिंदेसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे. घराघरात धनुष्यबाण पोहोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, लोकसभेत शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. विधानसभा निवडणुकीतही स्ट्राईक रेट इतर पक्षांच्या तुलनेत चांगला होता. आता कमी जागा लढून जास्त जागा जिंकलो हा देखील चांगला स्ट्राईक रेट आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नसलेल्या ठिकाणीही शिंदेसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, असे ते म्हणाले. राज्यात शिंदेसेनेचे ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून,  हा आकडा ७० पर्यंत वाढेल, असे ते म्हणाले. यात शिंदेसेनेच्या ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्षपदी निवडून आल्या, असे ते म्हणाले. नगर परिषद निवडणुकीत उद्धवसेना आणि महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. जे घरी बसले त्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिंदेसेनेची जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिंदेसेनेला हरवणं अशक्य आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना विरोधकांच्या आरोपाला कामातून उत्तर दिलं. अडीच वर्ष काम करत राहिलो ते महाराष्ट्राने पाहिलं म्हणून विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीला मिळाल्या. लाडकी बहिण योजनेला अनेकांनी विरोध केला मात्र शब्द पाळला आणि ही योजना सुरु झाली. करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सर्वात मोठी ओळख मला मिळाली, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 

‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार'
राज्यात मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी उपक्रम राबवला होता. साडेपाच कोटी नागरिकांना याचा फायदा झाला होता. आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य विभागाकडून‘ आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

Web Title: Local Body Election: 'Mumbai is the goose that lays golden eggs for Uddhav Sena', Eknath Shinde's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.