मुंबई - 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५' पुरस्काराचा दिमाखदार सोहळा मुंबईतील राजभवन येथे पार पडला. समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवराने या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकमत परिवारातून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्रिपदावरून देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केले तेव्हा सगळेच खळखळून हसले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला पुरस्कार द्यायला यायचंय, घ्यायला यायचं मला सांगितले नव्हते. मी मनापासून आभारी आहे. यापूर्वीही मला पुरस्कार दिला होता. ज्याला हा पुरस्कार मिळतो तो मुख्यमंत्री होतो, त्यामुळे पुढचे ५ वर्ष मलाच पुरस्कार देत राहा आणि दुसऱ्या कुणाला द्यायचा असेल तर मी सांगतो कुणाला द्यायचा...तेवढा चॉईस मला ठेवा असं त्यांनी गमतीने म्हटलं.
तर लोकमत हा माझ्याकरता परिवार आहे. त्यामुळे आपल्या घरची शाबासकी मिळाली, परिवारातून पुरस्कार मिळाला. त्याबद्दल लोकमतचे खूप आभार मानतो. कुठलाही पुरस्कार मिळाला तर त्यातून अधिक चांगले करायचे असं समजणाऱ्यांपैकी मी एक आहे. लोकमतने दिलेल्या पुरस्कारा अनुरूप भविष्यात माझे कार्य राहील असा शब्द देतो असं मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीतही मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केले. 'एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मी असेल, आम्हाला पद महत्वाचे नाही. ज्या पदावर असू, त्या पदाला न्याय द्यायचा, हे आमचे तत्व आहे. मी जेव्हा मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाचे जॅकेट घातले आणि काम सुरू केले. आता शिंदेसाहेब मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले, ते जॅकेट घालत नाहीत, पण पांढरा शर्ट घालतात. त्यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा शर्ट चढवलेला आहे. जी भूमिका मिळाली, ते चांगल्याप्रकारे वठवता आहेत. ते नगरविकास, एमएसआरडीसी, हाउसिंग सारखे महत्वाची खाती सांभाळत आहेत. त्या खात्याची कामे वेगाने झाली पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष असते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.