CM Devendra Fadnavis: राजधानी मुंबईतील राजभवन इथं आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्या तिखट प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार उत्तरे देत या सोहळ्याची रंगत वाढवली. या दोन दिग्गज नेत्यांच्या जुगलबंदीने रंगलेल्या मुलाखतीत पाटील यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं आहे.
"शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचे दोन-दोन वाक्यांमध्ये वर्णन करा," असं जयंत पाटील यांनी मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "मी या दोन्ही नेत्यांचं एकाच वाक्यात वर्णन करू इच्छितो आणि ते म्हणजे...काही भरवसा नाही."
दरम्यान, दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे वर्णन करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. मात्र काही भरवसा नाही, या वाक्यातच दोन्ही नेत्यांचे वागणे येते, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
"फोडलेले पक्ष दिसतात, पण..."
लोकमत आयोजित या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत जयंत पाटील यांनी पक्षफोडीबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिवाद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट करत असतो, तेव्हा आपल्याकडे चार बोटं असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. समोरच्यांना फोडलेले पक्ष दिसतात, पण चोरलेला जनादेश दिसत नाही. जर २०१९ ला लोकांनी दिलेला निकाल चोरला गेला नसता तर नंतर पक्षफोडीचा विषयच आला नसता आणि आम्ही हे पक्ष फोडलेच नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांवर त्याच्या पक्षनेतृत्वाने ती वेळ आणली," असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.