साहित्य आणि साहित्यिकाला जात-धर्म नसतो
By Admin | Updated: January 18, 2015 00:52 IST2015-01-18T00:52:28+5:302015-01-18T00:52:28+5:30
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा

साहित्य आणि साहित्यिकाला जात-धर्म नसतो
इंद्रजित भालेराव : उमरखेड येथे १०व्या मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
अविनाश खंदारे - उमरखेड
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी येथे केले.
जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (माहेश्वरी खुले नाट्यगृह) येथे आयोजित १० व्या मराठा साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर, नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा. डॉ. अशोक राणा, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, मधुकर मेहकरे, उमरखेडच्या नगराध्यक्ष उषा आलट आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी छापील भाषण न वाचता, येथे मुले आली आहेत, त्यांच्यासाठी मी कविता म्हणणार आहे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. शेतकरी म्हणजे मराठा नाही, जो शेतकरी तो मराठा, असे मी समजतो. शेतकऱ्यांच्या सुख-दु:खावर माझे लिखाण असून, सामाजिक भूमिकाही शेतकऱ्यांच्या दु:खात दडली आहे.जिजाऊच्या बालपणीची कविता लिहिणे किती अवघड होते, असे सांगत ‘जिजाऊ शिकते... एकुलती एकही’ ही कविता सादर केली. ‘बाप’ ही कविता अभ्यासक्रमातून बदलण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. तेव्हाची आठवण सांगताना भालेराव म्हणाले, बाप कधी बदलता येत नाही. त्यामुळेच आजही अभ्यासक्रमात ती कविता आहे. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही पाचवीच्या अभ्यासक्रमाला असलेली आपली कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. शेवटी त्यांनी बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीमध्ये येऊन बहुजन समाजाला स्पर्धेच्या युगात आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
संमेलनाचे उद्घाटक प्रा. शेषराव मोरे म्हणाले, मी कुठलाही साहित्यिक नाही. मी सतत देशहिताच्या संबंधावर लिखाण करीत असतो. त्याला मी स्वत:चं साहित्य म्हणत नाही. पण साहित्यिकांनी माझ्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करावी आणि त्याला राष्ट्रीयस्तरावर पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ. प्र. भा. काळे यांनी उमरखेड तालुक्याच्या जडणघडणीचा आणि साहित्य परंपरेचा आढावा सादर केला. माजी संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांनी, साहित्य हे न्याय मागण्याचे साधन झाले असून त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभाला माजी आमदार विजय खडसे, डॉ. छाया महाले, राम देवसरकर, डॉ. निर्मला पाटील, प्राकश शिंदे, सुरेश कदम उपस्थित होते. साहित्य संमेलनात युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. (शहर प्रतिनिधी)