वेदनांच्या सोबतीने आयुष्य काढायचे

By Admin | Updated: October 2, 2015 03:50 IST2015-10-02T03:50:42+5:302015-10-02T03:50:42+5:30

प्रशांत हा आमचा वंशाचा दिवा! रेल्वे बॉम्बस्फोटात नाहक बळी गेला. गेली काही वर्षे आम्ही अहोरात्र त्याच्या विरहात कशी काढीत आहोत ते आम्हालाच माहीत

Life has to be taken with the help of pain | वेदनांच्या सोबतीने आयुष्य काढायचे

वेदनांच्या सोबतीने आयुष्य काढायचे

लासलगाव (नाशिक) : प्रशांत हा आमचा वंशाचा दिवा! रेल्वे बॉम्बस्फोटात नाहक बळी गेला. गेली काही वर्षे आम्ही अहोरात्र त्याच्या विरहात कशी काढीत आहोत ते आम्हालाच माहीत. वेदनांच्या सोबतीने उरलेले आयुष्य कसेतरी काढायचे. अशा शब्दांत लासलगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गिरीधर बेंडाळे व आशालता बेंडाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या १८९ जणांमध्ये लासलगाव येथील प्रशांत गिरीधर बेंडाळे या अभियंत्याचाही समावेश होता. लासलगावच्या अमृतनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या गिरीधर व आशालता बेंडाळे यांचा प्रशांत हा एकुलता मुलगा. प्रीती व पूनम या दोन बहिणींचा एकटा भाऊ. त्याने प्रॉडक्शन इंजिनिअर व त्यानंतर एमबीएची पदवी घेतली होती. मुंबईला हिस्सार शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्च व्यवस्थापक पदावर तो कार्यरत होता. २६ जून २००६ रोजी त्याचा विवाह लीनाशी झाला होता. प्रशांतच्या विवाहानंतर त्याचे वडील गिरीधर बेंडाळे व आई आशालता बेंडाळे हे दोघेही मुलाचा संसार लावण्यासाठी ९ जुलैला गोरेगाव येथील फ्लॅटवर गेले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी विवाहाला पंधरा दिवस उलटत नाही, तोच ११ जुलै २००६ रोजी माटुंगा रेल्वेस्थानकावर सायंकाळी लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्यात झालेल्या बॉम्बस्फोटात प्रशांतचा मृत्यू झाला. रेल्वेतील बॉम्बस्फोटाने बेंडाळे दांपत्याचा एकुलता मुलगा हिरावून नेला.

Web Title: Life has to be taken with the help of pain