दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात! मराठी साहित्य संमेलनात गीतांचे स्वर गुंजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:24 IST2025-01-19T10:24:06+5:302025-01-19T10:24:13+5:30
हजारो मराठी रसिकांच्या साक्षीने तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात! मराठी साहित्य संमेलनात गीतांचे स्वर गुंजणार
- स्वप्नील कुलकर्णी
मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत फेब्रुवारीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात दोन संमेलन गीतांचे स्वर गुंजणार आहेत. गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी ‘आम्ही असू अभिजात, आम्ही असू अभिजात, दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात’ हे संमलेन गीत लिहिले असून, दुसरे संमेलन गीत गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार कौशल इनामदार साकारणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच रसिकांच्या भेटीला येऊ शकते अशी महिती मिळत आहे.
नामवंत गायकांचा सुरेल साज
देवळेकर यांचे गीत संगीतकार आनंदी विकास यांनी ते संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, गायिका प्रियांका बर्वे यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार या गायकांच्या सुरेल आवाजाचा या गीताला साज चढला आहे.
दिग्गजांच्या साक्षीने गायन
हजारो मराठी रसिकांच्या साक्षीने तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच दिल्लीतील संमेलनात दोन गीते असण्याची शक्यता आहे. ही दोन्ही गीते तेवढ्याच तोलामोलाची आहेत, असे संमेलनाचे आयोजक संस्था ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले.
गीत संगीतबद्ध करताना मला ‘अभिजात’ भाषेचा इतिहास संगीतबद्ध करायला मिळाला, याचे समाधान आहे.
- आनंदी विकास, संगीतकार
मराठी मातीची निर्मिती, सिंधू संस्कृती, सातवाहन काळ आहे, या वेगवेगळ्या टप्प्यांचा आढावा संमेलन गीताच्या दहा कडव्यांत घेतला आहे.
- डॉ. अमोल देवळेकर, गीतकार