चला लावू या थर...
By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:32:45+5:302014-08-18T00:32:45+5:30
दहीहंडीच्या उत्सवावर उच्च न्यायालयाने नियमांचे निर्बंध घातल्याने, या उत्सवावर विरजण पडले होते. दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने

चला लावू या थर...
गोकुळ अवतरणार : आयोजक आणि पथक सुखावले
नागपूर : दहीहंडीच्या उत्सवावर उच्च न्यायालयाने नियमांचे निर्बंध घातल्याने, या उत्सवावर विरजण पडले होते. दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिल्यामुळे, आयोजक आणि पथक सुखावले आहे. आता आणखी भव्यतेने आयोजन करणार असल्याची प्रतिक्रीया आयोजकांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गोकुळष्टमीला दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्पोरेट क्षेत्र व राजकीय नेत्यांनी या आयोजनाची जबाबदारी स्वीकारल्याने, राज्यभरात दहीहंडीचे आयोजन भव्य होते. करोडो रुपयांच्या बक्षिसांची यावर लूट होते. हंडी फोडून बक्षीस लुटण्यासाठी गोविंदा पथकही महिनाभरापूर्वीपासून तयारीला लागतात. मुंबईत दहीहंडीच्या उत्साहात घडलेल्या अपघातामुळे उच्च न्यायालयाने या आयोजनावर नियमांचे निर्बंध लावले होते. हंडीची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी, गोविंदा पथकात १८ वर्षाखाली युवकांचा समावेश नसावा, आयोजन मोकळ्या मैदानात असावे, या नियमांमुळे दहीहंडीचा थरार थांबणार होता. आयोजकांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिल्याने आयोजकांसह गोविंदा पथक सुखावले आहे.
नागपुरातही सात ते आठ ठिकाणी दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात येते. या हंड्या फोडण्यासाठी नागपूरसह मध्यप्रदेशातूनही गोविंदा पथक नागपुरात येतात. इतवारीतील सराफा दहीहंडी विदर्भातील सर्वात मोठ्या बक्षिसाची हंडी आहे. सुभेदार लेआऊट, छापरू नगर, प्रतापनगर, बुटीबोरी, वर्धमाननगरातील, भगवान नगरातील दहीहंड्या या प्रसिद्ध आहेत. या सर्व आयोजकांनी पोलिसांच्या परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यांना परवानगीही मिळाली होती. मात्र सोबतच पोलिसांनी एक मार्गदर्शक सूचनेची नोटीस त्यांना दिली होती. या सूचनांमुळे दहीहंडीच्या उत्सवावर विरजण येणार असल्याने, आयोजन रद्द करण्याची मानसिकता आयोजकांनी बनविली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आयोजकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते तयारीला लागले आहे. (प्रतिनिधी)