अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

By Admin | Updated: March 2, 2017 02:10 IST2017-03-02T02:10:37+5:302017-03-02T02:10:37+5:30

पंप हाउस या ठिकाणच्या अनिरुद्ध क्लासेसमध्ये चमत्कार व विज्ञान हा कार्यक्रम संपन्न झाला.

Lessons for eradication of superstitions | अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे


मुंबई : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने अंधेरी पूर्व येथील पंप हाउस या ठिकाणच्या अनिरुद्ध क्लासेसमध्ये चमत्कार व विज्ञान हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र अंनिस नंदकिशोर तळाशिलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अनिरुद्ध क्लासेसमधील जवळपास ८० मुले-मुली उपस्थित होती. या मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे दिले गेले. नारळातून काळी रिबीन काढणे. नारळाला तीन डोळे असतात, त्यातील एक डोळा हा मुलायम असतो. तो डोळा फोडून त्यात तांत्रिक-मांत्रिक काळी रिबीन टाकतात आणि लोकांना फसवतात. लिंबातून करणी काढणे आणि उतरवणे. लिंबामधून एखाद्या व्यक्तीची नजर काढताना लाल दोऱ्यांचा वापर करतात. लिंबामध्ये सायट्रीक अ‍ॅसिड असते त्यामुळे लाल दोरा हा काळा होतो, याने तुम्हाला नजर लागली आहे असे सांगितले जाते. मग ही नजर उतरवण्यासाठी दूध घेतले जाते. ते दूध नसून चुन्याची निवळी असते. त्यात लाल दोरा बुडवला जातो. मग तो आपल्या मूळ रूपाात येतो. मग आपल्याला सांगितले जाते की, तुमची नजर उतरवली गेली आहे. अशी काही प्रात्यक्षिके मुलांना करून दाखवली.
आपण जेव्हा चमत्कार पाहतो त्या वेळी आपले डोळे उघडे ठेवून वैज्ञानिक दृष्टीने निरीक्षण केले पाहिजे. शाळेमध्ये विज्ञानाच्या प्रयोगामध्येदेखील निरीक्षण असते. एकदा का निरीक्षण बरोबर आले की प्रयोग अचूक ठरतो. चमत्कार करणारे बदमाश असतात; कारण ते तुम्हाला लुटायला आणि फसवायला आलेले असतात. चमत्कारावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात. जर चमत्कारावर विश्वास ठेवला तर आपण आपल्या सद्विवेक बुद्धीचा उपयोग करत नाही. समाजामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली लुटले जाते, हे बघूनदेखील कोणी याला विरोध करीत नाहीत ते लोक षंड असतात, असे अब्राहम कोहूर यांनी सांगितले. त्यांना या चळवळीचे पितामह म्हणून संबोधले जाते. नंदकिशोर तळाशिलकर म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार केला तर तो खरा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होईल. घटनेत ज्याप्रमाणे सांगितले आहे, त्याप्रमाणे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. पण या ठिकाणी उलट परिस्थिती आहे. अंधश्रद्धेचाच प्रचार आणि प्रसार केला जातोय. आपण सर्वांनी विज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करून घेतला पाहिजे. या वेळी विशेष गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समाजसेवक सुभाष सारंग यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Lessons for eradication of superstitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.