संजय कांबळे, बिर्लागेट -मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर पावसाळ्यात डोंगर कोसळून ओढवलेल्या आपत्तीने संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील अशा आपत्तीची माहिती व्हावी, तसेच अशा वेळी सामना कसा करावा, याकरिता राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा नवीन अभ्यासक्रमांतर्गत मराठी माध्यमाच्या पाचवीच्या मराठी बालभारती पुस्तकात ‘माळीण गाव... एक घटना’ या धड्याचा समावेश केला आहे.भीमाशंकर परिसरात आणि डिंबा धरणाजवळ २९ जुलै २०१४ ला माळीण दुर्घटना घडली. पाऊस सुरू असताना डोंगर कोसळून होत्याचे नव्हते झाले. एक संपूर्ण गाव गाडले गेले. बचावकार्यादरम्यान १५१ मृतदेह सापडले. आठ दिवस बचावकार्र्य सुरू होते. देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच घटनास्थळी दौरा करून सरकारी मदतीच्या घोषणा केल्या. मात्र, त्या हवेत विरल्या असून आजही गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.दुर्घटनेनंतर घटना का घडली, तिला जबाबदार कोण, यावर बराच काथ्याकूट झाला. मात्र, आजपर्यंत नेमके कारण कोणालाच सांगता आले नाही. डोंगरावरील शेती, त्यासाठी डोंगरमाथ्यावर खोदण्यात आलेले तलाव, सह्याद्री पर्वतरांगांमधील बेसुमार वृक्षतोड आदी कारणे दुर्घटनेसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.ही सर्व घटना, घडामोडी, कारणे, उपाय या धड्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पाचवीच्या पुस्तकात बारावा धडा ‘माळीण एक घटना’, पृष्ठ क्रमांक ३६ वर असून धड्याखाली विचारलेल्या प्रश्नांमुळे नैसर्गिक आपत्तीला नेमके जबाबदार कोण तसेच पाणी, वृक्ष, डोंगर यासारखे घटक आपल्या दैनंदिन जीवनावर कसे प्रभाव टाकून आहेत, हे समजून घेण्यास या धड्याची नक्कीच मदत होणार आहे.आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असतात. त्यामुळे घडून गेलेल्या आपत्तीतून नेमका काय धडा घ्यायचा, याचे शिक्षण त्यांना मिळाले तर भविष्यात अशा आपत्ती टाळता येऊ शकतील किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. - एस.जे. कांबळे, पालक, वरप, ता. कल्याणसर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांना यानिमित्ताने माळीण गावची ओळख होईल व ही घटना त्यांच्या बौद्धिक स्तरावर जाऊन सोप्या भाषेत समजाविण्यासाठी या धड्याचा उपयोग होईल. - एक शिक्षक, जि.प. शाळा, कल्याणही घटना घडल्यानंतर १४ आॅगस्ट २०१४ रोजी आम्ही माळीण गावास भेट दिली. १५ आॅगस्टचा स्वातंत्र्य दिन वाचलेल्या लोकांबरोबर साजरा केला. त्या वेळी त्यांच्याकडून या आपत्तीची भीषणता समजली. आजही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.- किशोर तांबे, शहाजी जाधव, सा. कार्यकर्ते, पाथर्ली, कल्याण
बालभारतीमध्ये ‘माळीण’वर धडा
By admin | Updated: June 7, 2015 01:36 IST