कुष्ठरोग वसाहत होणार कधी स्मार्ट?
By Admin | Updated: July 26, 2016 21:16 IST2016-07-26T21:16:56+5:302016-07-26T21:16:56+5:30
एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना

कुष्ठरोग वसाहत होणार कधी स्मार्ट?
रवींद्र देशमुख,
सोलापूर : एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना कुमठानाका परिसरातील कुष्ठरोग रूग्णालय आणि वसाहतीच्या भग्नतेकडे झगमगाटाच्या मागे लागलेल्या महापालिकेचे पुरते दूर्लक्ष झाले आहे. वसाहतीतील सर्वच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. रूग्ण पत्र्याचे शेड बांधून जीवन कंठत आहेत.
लेप्रसी हॉस्पीटल आणि वसाहतीमध्ये ह्यलोकमतह्ण पोहोचल्यानंतर रूग्णांना आपले मन मोकळे करण्याची आणि समस्या मांडण्याची संधी मिळाली. या वसाहतीमध्ये सध्या ६४ रूग्ण आपल्या परिवारासह राहून उपचार घेतात. बरेच रूग्ण तेथे २०, ३० आणि ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. रूग्णांना चपाती, डाळ भाताचं भोजन दिलं जातं तत्पूर्वी सकाळी नास्ता अन् चहा मिळतो. महापालिकेने २५ मे १९८४ रोजी सिव्हील सर्जनकडून लेप्रसी रूग्णालयाने ताब्यात घेतले. त्यानंतर वसाहतीची दुर्दशाच सुरू झाली...कुष्ठरोगाचे रूग्ण व्यंकटेश कुलकर्णी सांगत होते.
किसन केशभट्ट जोशी हे गेल्या चाळीस वर्षांपासून कुटुंबासह वसाहतीत राहून उपचार घेत आहेत... काय करावे हो, आता माझे मेडिकल रिपोर्ट सगळे चांगले आहेत. मी लेप्रसी निगेटीव्ह आहे; पण समाजात जावून राहू शकत नाही. लोक स्वीकारत नाहीत. आमच्या पिढ्या मात्र निरोगी जन्मल्या, हेच सुदैव. एक मुलगी आहे. पुण्याला दिलंय तिला. तिचा संसार उत्तमपणे सुरू आहे. मी बारावी पास झाल्यानंतर मलेरिया सर्व्हीलन्स वर्कर म्हणून नोकरीला लागलो. मूळचा गुलबर्ग्याचा आहे... नोकरी उत्तमपणे सुरू होती; पण काम करीत असताना या रोगाची लागण झाली...याच आजाराची रूग्ण असलेल्या अनुसया कुलकर्णीबरोबर माझे लग्न झाले अन् आमचा संसार इथे सोलापुरात सुरू झाला...जोशी सांगत होते.
किसनराव म्हणाले,आमच्या वसाहतीला आता पुनर्वसनाची गरज आहे. सर्वत्र पडझड झाली आहे. बाहेरच्या लोकांनी अतिक्रमणही केले आहे. घरांच्या भिंती आणि छप्पर पडल्यामुळे आमचे लोक पत्र्याचे शेड उभारून राहत आहेत...व्यंकटेश कुलकर्णी यांनीही वसाहतीच्या अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. रमानाथ झा यांच्यासारखा एखादा अधिकारी आला पाहिजे. झा यांनीच ही वसाहत महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. त्यांना खूप सुधारणा करायच्या होत्या; पण त्यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याची नेहमीच बदली होते. पूर्वी १२५ एकराच्या विस्तीर्ण जागेत असलेली ही वसाहत आणि रूग्णालय अतिक्रमणामुळे आता केवळ आठ एकराची झाली आहे.
-
कुष्ठरोग वसाहतील पडझड झालेल्या घरांचे बांधकाम करावे. महापालिकेने आम्हाला उत्तमपणे आसरा देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मोकळ्या जागेत रूग्णांना उपयुक्त होतील, असे उपक्रम सुरू करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून अनुदान घ्यावे.
- किसन जोशी, रूग्ण
महापालिकेने आमची दूर्दशा केली आहे. या वसाहतीकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिकेचा कोणताही आरोग्य अधिकारी टिकून राहत नाही. त्यामुळे आमच्या समस्या टिकून राहून सोडविणार तरी कोण? आमची अशी अवस्था करणाऱ्या महापालिकेला महारोग्यांचा शाप लागेल.
- व्यंकटेश कुलकर्णी