बाळासाहेबांसमोर मान झुकवणारे नेते जुने दिवस विसरले..
By Admin | Updated: October 21, 2015 10:47 IST2015-10-21T09:48:42+5:302015-10-21T10:47:16+5:30
शिवसेनेने भाजपा नेते व बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचे फोटो पोस्टरवर छापत नेत्यांना जुन्या दिवसांचा विसर पडल्याचा टोला भाजपाला हाणाला आहे.

बाळासाहेबांसमोर मान झुकवणारे नेते जुने दिवस विसरले..
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - महाराष्ट्रात युतीचे सरकार असतानाही सत्ताधारी भाजपा- शिवसेनेमध्ये सतत काही ना काही कुरबुरी सुरूच असून त्यांच्यातील ही दरी वाढतच चालली आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
शिवसेनेने सेना भवनच्या परिसरात भाजपावर थेट टीका करणारे पोस्टर लावले आहेत. 'विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी..' अशा प्रकारची पोस्टरबाजी शिवसेनेने केली आहे. जे भाजपा नेते एकेकाशी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असत, तेच नेते आता मागील दिवस विसरले अाहेत, असा टोला शिवसेनेने हाणला आहे. या पोस्टरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो लावण्यात आले आहेत.
शिवसेना आणि बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून पुन्हा करण्यात आला आहे.