भिवंडी: ठाणेभिवंडी मेट्रो पुलावरून निसटलेली सळई खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी नारपोली परिसरात घडली आहे.या अपघातात प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेने मेट्रोच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.सोनू अली, वय २० रा.विठ्ठलनगर असे जखमी युवकाचे नाव आहे.
नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामात एक सळई थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली.या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झाला.स्थानिकांच्या मदतीने जखमी सोनू अली यास अंजूरफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा अपघात नेमकी कोणाच्या चुकीमुळे व कसा घडला याबाबत अधिक तपास भोईवाडा पोलिस करीत आहेत.
मेट्रोच्या कामातील गलथान पणामुळे आज एका युवकाची मृत्यूशी झुंज सुरु असून या दुर्घटनेबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी व जखमी तरुणास तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.