लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:43 IST2025-02-15T07:42:55+5:302025-02-15T07:43:22+5:30
लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात.

लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील
हरी मोकाशे
लातूर : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक अन् तेलंगणाच्या सीमाभागातून आलेल्या तुरीद्वारे लातूरच्या १५० कारखान्यांमध्ये दररोज एकूण ३ हजार १५० टन डाळीची निर्मिती होत आहे.
लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात. बाजार समितीत शेतमालाचा वेळेवर मापतोल व शेतकऱ्यांना लगेच पट्टी मिळते. येथे तूरडाळ निर्मितीचे प्रकल्पही दीडशेवर गेले असून, ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे.
शेतकऱ्यांना किती मिळेल भाव?
सहा महिन्यांपूर्वी तुरीने उच्चांकी भाव गाठल्याने शेतकऱ्यांनी तूर उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने आवकही वाढली.
परिणामी, दर उतरले असून, सध्या ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे दर ८ हजारांपर्यंत पोहोचतील, असा डाळ उद्योजकांचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या तूरडाळीमध्ये लातूर ब्रॅण्ड जगभर जात आहे. १५० कारखान्यांमधून २० हजार जणांना रोजगार मिळतो. तुरीचे दर कमी-जास्त झाले तरी लातूरच्या डाळीची गुणवत्ता कायम आहे. त्यामुळे इथल्या डाळीला दक्षिण भारतात सर्वाधिक मागणी आहे. देशातील मोठे व्यापारी हीच डाळ पॅकेजिंग करून निर्यात करीत आहेत. - नितीन कलंत्री, डाळ उद्योजक