पाण्याअभावी लातूरमध्ये शस्त्रक्रिया कक्षच बंद!
By Admin | Updated: July 15, 2014 03:03 IST2014-07-15T03:03:14+5:302014-07-15T03:03:14+5:30
लातूर शहराला बसणाऱ्या पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसतेच आहे. परंतु तिची दाहकता आता वैद्यकीय क्षेत्रालाही जाणवत आहे.

पाण्याअभावी लातूरमध्ये शस्त्रक्रिया कक्षच बंद!
लातूर : लातूर शहराला बसणाऱ्या पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसतेच आहे. परंतु तिची दाहकता आता वैद्यकीय क्षेत्रालाही जाणवत आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात दोन दिवसांपासून चक्क पाण्याअभावी शस्त्रक्रिय कक्षच बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ याला रुग्णालायच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. रुग्णालयाचे उन्हाळ्यात आटलेले बोअर आणि दर १५ दिवसांत एकदा पाणीपुरवठा होणाऱ्या शहरात फुटलेल्या पाईपलाइनकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते़
लातूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात प्रसूति, अस्थिव्यंगोपचार आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया असे तीन विभाग आहे. गेल्या दोन दिवसांत फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया विभाग वगळता अन्य दोन विभागांतील शस्त्रक्रिया कक्ष पाणी नसल्यामुळे बंद ठेवण्याची नामुष्की रुग्णालयावर ओढवली आहे.
स्त्री रोग व प्रसूति विभागात किमान दररोज सहा ते सात तर अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया विभागात किमान दररोज पाच ते सहा शस्त्रक्रिया होतात. जास्तीत जास्त हा आकडा तिप्पट जात असतो. परंतु प्रसूतिविभागात गुरुवारपासून तर अस्थिव्यंगोपचार विभागात तीन दिवसांत या एकही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. आधीच बोअरचे पाणी कमी झाल्याने रुग्णालयाची भिस्त महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या पाण्यावर होती. त्यात भरीस भर म्हणून बीएसएनएलचे केबलसाठी खोदकाम करताना रुग्णालयाची पाईपलाइन नऊ जुलैला फुटल्याने या संकटात आणखी भर पडली आहे़ (प्रतिनिधी)