कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला
By Admin | Updated: August 22, 2014 01:38 IST2014-08-22T01:38:53+5:302014-08-22T01:38:53+5:30
काँग्रेसच्या कार्यकाळात गती देण्यात आलेल्या प्रकल्पांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी संविधान चौकात आंदोलन करणाच्या हेतूने

कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला
मोदींच्या सभेआधी तणाव : विकास ठाकरेंसह अनेकांना अटक
नागपूर : काँग्रेसच्या कार्यकाळात गती देण्यात आलेल्या प्रकल्पांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी संविधान चौकात आंदोलन करणाच्या हेतूने आलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या वेळी काही वेळ तणाव निर्माण झाला. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये डांबून पोलीस लाईन येथील मुख्यालयात नेण्यात आले. नंतर रात्री ९ वाजता सर्वांची सुटका करण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
कस्तूरचंद पार्कवर सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. दुपारी ४.१५ च्या सुमारास काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते संविधान चौकात जमले. काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याचे पाहून पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले पण कार्यकर्त्यांनी नकार दिला.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला असता विकास ठाकरे यांनी विरोध केला. ते म्हणाले, आम्ही कुठलीही नारेबाजी केलेली नाही, काळे झेंडे दाखविलेले नाहीत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. त्यामुळे येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमलो आहोत, असा युक्तिवाद केला. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याकडे तुम्ही मोदींच्या दौऱ्यात आंदोलन करण्यासाठी येथे जमले असल्याची माहिती असल्याचे सांगून येथून दूर जाण्यास सांगितले. ठाकरे यांनी ते नाकारले. या वेळी पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. काहींचे कपडे फाटले. यामुळे कार्यकर्ते भडकले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’, ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणारी वाहतूक थांबली. बघ्यांची मोठी गर्दी जमली.
पोलिसांच्या विनंतीनंतरही काँग्रेस कार्यकर्ते जागेवरून हलण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेवटी अतिरिक्त पोलीस पथक बोलाविण्यात आले. दुपारी ४.३५ वाजता पोलिसांनी कार्यकर्त्यांना चौतर्फा घेरा घातला व ताब्यात घेण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी ताकदीने विरोध केला. या वेळी पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. शेवटी पोलिसांनी लाठीहल्ला करीत धरपकड सुरू केली. विकास ठाकरे यांच्यासह नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, सरस्वती सलामे, शीला मोहोड, देवा उसरे, प्रशांत कापसे, दीपक वानखेडे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात आले व पोलीस लाईन्स येथील मुख्यालयात नेण्यात आले.
कार्यकर्त्यांनी पोलीस मुख्यालयातही नारेबाजी केली. तेथे पोलिसांनी आम्ही निदर्शने करण्यास आलो होतो, यानंतर असे करणार नाही, असे लिहिलेल्या कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला. शेवटी रात्री ९ पर्यंत सर्वांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले. पंतप्रधान मोदी रवाना झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)