“परीक्षा आहेच, त्याहीपेक्षा बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते”: वैभवी देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:17 IST2025-02-26T12:14:31+5:302025-02-26T12:17:39+5:30
Beed Santosh Deshmukh Case: माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

“परीक्षा आहेच, त्याहीपेक्षा बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते”: वैभवी देशमुख
Beed Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही एक आरोपी फरार आहे. तसेच सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. विविध मागण्यासाठी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबतचा आदेश जारी केला. संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने लोटले असून, तपासात कोणतीही प्रगती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर ती मान्य करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकिलांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते
आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मागण्यासाठी जे करणे शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणे मला जास्त महत्त्वाचे वाटते, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हा जो तपास सुरू आहे, यामध्ये त्यांच्या नियुक्तीचा फायदा होऊ शकतो. आता आरोपपत्रही दाखल होणार आहे, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असेल तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.