अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू
By Admin | Updated: December 2, 2014 00:14 IST2014-12-01T23:48:12+5:302014-12-02T00:14:03+5:30
विनोद तावडे : चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरविणार

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू
कणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अॅड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष एस. टी. सावंत, हरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, डॉ. अभय सावंत, उपस्थित होते. तावडे म्हणाले, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आता थोडा धीर धरावा.
आम्हाला थोडा वेळ द्यावा, आम्ही शेतकऱ्यांचे चित्र बदलू. दुष्काळी भागात अजित पवारांचे दौरे सुरू असून, त्या भागासाठी कर्ज देण्याची मागणी करत आहेत. मंत्री असताना ते कधी या भागात दिसले नाहीत.
सिंधुदुर्गाच्या मातीने अनेकांना मोठे केलं. आम्हाला ज्या मातीने मोठे केले. त्या मातीला कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्गाचे प्रश्न आपलेपणाने सोडवेन. मंत्रिपदाचा लालदिवा असला तरी कधीही आपल्यामध्ये अंतर पडणार नाही, असे तावडे म्हणाले.
विविध संस्थांसमवेत गटचर्चा
कार्यक्रम १२.४५ वाजता सुरू झाला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांचे एकट्याचे भाषण झाले. त्यानंतर तावडे यांनी व्यासपीठावरून खाली येत संस्था प्रतिनिधींच्या गटांशी वेगवेगळी चर्चा केली आणि निवेदने
स्वीकारली.
स्वच्छतागृहांअभावी शाळा सोडतात
राज्यातील शिक्षणक्षेत्राची माहिती घेताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सातवीनंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातील ५ टक्के मुली शेतीच्या कामांसाठी म्हणून शाळा सोडतात, पण ९५ टक्के मुली स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने शाळा सोडतात. स्वच्छतागृहांअभावी मुलींना योग्यप्रकारे स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना विविध आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक शिक्षण सोड, पण जीव वाचव, असे सांगून शाळा सोडायला लावतात.