शहीद धनराज प्रभाकर मेश्राम यांना अखेरची मानवंदना
By Admin | Updated: June 7, 2016 18:34 IST2016-06-07T17:30:50+5:302016-06-07T18:34:25+5:30
केंद्रीय दारूगोळा भांडारात (सीएडी कॅम्प) झालेल्या भीषण अग्निस्फोटात वीरमरण आलेले शहिद धनराज प्रभाकर मेश्राम यांच्यावर मंगळवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

शहीद धनराज प्रभाकर मेश्राम यांना अखेरची मानवंदना
शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार : हजारो शोकाकुल नागरिकांनी दिला अखेरचा निरोप
नागपूर : केंद्रीय दारूगोळा भांडारात (सीएडी कॅम्प) झालेल्या भीषण अग्निस्फोटात वीरमरण आलेले शहिद धनराज प्रभाकर मेश्राम यांच्यावर मंगळवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी शहिद मेश्राम यांना हुंदके आवरत अखेरचा निरोप दिला. पुलगावच्या सीएडीत ३० मेच्या मघ्यरात्री भीषण अग्निस्फोट झाला. जानमालाची भयावह हानी टाळण्यासाठी कर्नल रंजीत पवार आणि मेजर के. मनोजकुमारसह एकूण १९ जणांनी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले.
स्फोट एवढा भयंकर होता की त्यातील धनराज प्रभाकर मेश्राम (नागपूर), कुलदीपसिंग श्रीसंतलाल (हरियाणा), अरविंदकुमार पीडदान (भिवानी, हरियाणा), शेखर बाळस्कर (पिंपळा ता. आर्वी.), बाळू पाखरे (पुलगाव) आणि प्रमोद मेश्राम(पुलगाव) यांच्या देहाची अवस्था ओळखण्यापलिकडे झाली. त्यामुळे या सहा शहिदांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाने त्यांची नागपूरच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करवून घेतली. सोमवारी तसा अहवाल मिळाल्यानंतर सीएडी प्रशासनाने या शहिदांचे पार्थिव त्यांच्या परिवाराच्या स्वाधिन केले. त्यानुसार, शहिद धनराज मेश्राम यांचे पार्थिव सैन्यदलाच्या सजवलेल्या वाहनात त्यांच्या ओमनगरातील घरी आणण्यात आले. ही माहिती कळताच आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येत नागरिक शहिद मेश्राम यांच्या घरी पोहचले.
शहिद मेश्राम यांची पत्नी रोहिणी, त्यांची मुले आणि नातेवाईकांसह ठिकठिकाणांहून आलेल्या नातेवाईक आणि हजारो नागरिकांनी शहिद मेश्राम यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा नारा घाटाकडे निघाली. वाटेत ठिकठिकाणी त्यांच्यावर फुले उधळली जात होती. ह्यशहिद धनराज मेश्राम अमर रहेह्णच्या घोषणाही दिल्या जात होत्या. नारा घाटावर शहिद मेश्राम यांच्या सहका-यांनी त्यांच्या दिलेरीच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना अग्नी दिला. यावेळी जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहिद मेश्राम यांना अखेरची मानवंदना दिली.
--
वीर पतीचा अभिमान : वीरपत्नी रोहिणी मेश्राम
देशाच्या आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे पाहून आपल्या पतीने स्वत:चे बलिदान दिले. त्यांच्या जाण्याचे दु:ख शब्दातीत असले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी सैन्यात भरती करेन, अशी प्रतिक्रिया शहिद मेश्राम यांच्या वीरपत्नी रोहिणी धनराज मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.