The last minister in the cabinet of Yashwantrao is behind the scenes | यशवंतरावांच्या मंत्रिमंडळातला शेवटचा मंत्री काळाच्या पडद्याआड

यशवंतरावांच्या मंत्रिमंडळातला शेवटचा मंत्री काळाच्या पडद्याआड

-दिनकर रायकर
बी. जी. खताळ पाटील यांचे सोमवारी पहाटे निधन झाले आणि त्यांच्या काळात मी पत्रकारिता करत असतानाच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. खताळ पाटील या नावानेच ते ओळखले जात. अत्यंत निगर्वी, कोणाच्या चहाचेही मिंधे नसलेले आणि स्वत:च्या हुशारीवर, कर्तृत्वावर त्यांनी स्वत:ची ओळख तयार केली होती. ते अहमदनगरच्या कोर्टात वकिलीची प्रॅक्टीस करत होते. नामवंत वकील असल्याने त्यांच्याकडे कामाचा ओघ प्रचंड असायचा. त्या तुलनेने अन्य वकिलांकडे फारशा केसेस नसायच्या. जेव्हा खताळ पाटील मंत्री झाले तेव्हा त्यांची वकिली बंद होणार, व आपल्याला चांगले दिवस येणार, हा आनंद साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या वकिलांनी सत्यनारायणाची पूजा घातली होती..! हे एक उदाहरण त्यांची विद्वत्ता आणि मोठेपण सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरावे.
महाराष्टÑ स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात खताळ पाटील मंत्री होते. त्यांच्या जाण्याने यशवंतरावांच्या मंत्रिमंडळातील शेवटचा मंत्री आज काळाच्या आड गेला. ते वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पत्रकारांच्या प्रेसरुमध्ये येऊन त्यांच्या डब्यात जेवण करणारे जे मोजके मंत्री होते, त्यात खताळ पाटील होते. (आज किती मंत्री असा स्नेह जोपासतात...?) त्यांच्याकडे परिवहन खाते होते. त्याच काळात सिने अभिनेत्री बिंदू खूप प्रसिद्ध होती आणि खताळ पाटील यांना कायम आकडेवारीत बोलण्याची खूप आवड. आकडेवारी सांगताना ते शंभर टक्के मराठीचा वापर करायचे. परिवहन विभाग असो की जलसंपदा विभाग. ते सतत आकडेवारी सांगताना, धरण ५५ बिंदू ४५ टक्के भरले, एसटीचे प्रवासी ५ बिंदू ८ टक्क्यांनी वाढले; असा उल्लेख करायचे. आपण सहज बोलताना जेथे अमूक पॉर्इंट अमूक टक्के असे सांगतो तेथे ते पॉर्इंटचा उल्लेख ‘बिंदू’ असा करायचे. त्यांचा ‘बिंदू’ या शब्दावर जोर देऊन बोलणे ऐकले की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हंशा ठरलेला असायचाच. त्यांना अनेकदा सहकारी सदस्य विचारायचे, साहेब, ही बिंदू कोण...? त्यावर ते ही हसत हसत, ‘तुम्हाला बिंदू माहिती नाही...?’ असे विचारायचे आणि पुन्हा सभागृहात हंशा पिकायचा.

खताळ पाटील मंत्री झाले. त्यांच्याकडे एस.टी. महामंडळ, विधि व न्याय, नागरी पुरवठा अशी अनेक खाती होती. पण त्यांनी आपल्या मुलांना कधी मंत्रिपदाची हवा लागू दिली नाही. मुलांना व घरच्यांना त्यांनी एकदाही मंत्र्यांसाठीची किंवा मंत्री कार्यालयासाठीची गाडी वापरायला दिली नाही. मुलांना ते कायम बसने शाळेत जायला सांगायचे. मंत्रिपद हे औटघटकेचे असते. ते कधी येते, कधी जाते कळत नाही, त्यामुळे नको त्या सवयी लावून घेऊ नका असे ते कायम सांगायचे. मंत्रिपद गेल्यानंतर लगेच सरकारी बंगला सोडून गावाकडे जाऊन शेती करावी लागेल, हे विसरु नका, असे ही ते आवर्जून मुलांना सांगायचे. (आत्ताचे मंत्री गाडी, घोड्यांवर त्यांचा जन्मसिध्द हक्क असल्यासारखे वागतात, मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी गेल्यावर बंगले सोडत नाहीत. त्यांना त्यातून हूसकून लावण्यापर्यंत वेळ येते, तरीही ते घर सोडत नाहीत.) बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असतानाच्या काळात सिमेंट घोटाळा झाला. नागरी पुरवठा खाते खताळ पाटील यांच्याकडे होते. त्यामुळे सभागृहात होणाऱ्या आरोपांना उत्तरे देण्याची जबाबदारी त्यांच्यावर यायची. ते निष्णात वकील असल्याने कशीबशी उत्तरे देऊन वेळ मारुन न्यायचे. बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मात्र, उत्तरे देताना आपली कशी घालमेल होते हे कबूलही करायचे, एवढा मनाचा मोकळेपणाही त्यांच्याकडे होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The last minister in the cabinet of Yashwantrao is behind the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.