लाखो भाविकांचे कुंभस्नान !

By Admin | Updated: August 30, 2015 02:56 IST2015-08-30T02:56:00+5:302015-08-30T02:56:00+5:30

छत्र, चामरे आणि निशाण नाचवित शाही मिरवणुकीने मार्गक्रमण करीत ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गोदामाईच्या भेटीची आस लागलेल्या जटाधारी साधू-महंतांनी ब्रह्ममुहूर्तावर

Lakhs of devotees of Kumbhnan! | लाखो भाविकांचे कुंभस्नान !

लाखो भाविकांचे कुंभस्नान !

नाशिक : छत्र, चामरे आणि निशाण नाचवित शाही मिरवणुकीने मार्गक्रमण करीत ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गोदामाईच्या भेटीची आस लागलेल्या जटाधारी साधू-महंतांनी ब्रह्ममुहूर्तावर नाशिकक्षेत्री रामकुंड, तर त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थाकडे वायू वेगाने झेपावत अन् सिंहस्थ कुंभपर्वातील पहिल्या पर्वणीत गोदेच्या प्रवाहात सदेह झोकून देत शाहीस्नान केले.
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत गोदामाईच्या साक्षीने ‘धर्मरक्षा’बंधनाचा हा सोहळा रंगला. शैव-वैष्णवांच्या मुख्य शाहीस्नानानंतर दिवसभरात लाखो भाविकांनी गोदावरीत स्नान केले. पहाटे तपोवनातील साधुग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीत वैष्णव संप्रदायातील निर्वाणी, दिगंबर व निर्मोही आखाड्यासह त्यांचे खालसे सजविलेल्या वाहनांतून निघाले होते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, श्री महंत धर्मदास महाराज, महामंत्री गौरीशंकरदास, उपमहंत जगन्नाथदास, राधेश्याम महाराज यांच्यासह त्यांचे सात आखाडे आणि खालशांच्या महंतांनी गोदावरी पूजन करीत स्नानाचा संकल्प सोडला. सकाळी १०.३० वाजेनंतर भाविकांना रामकुंड व गांधी तलाव परिसर स्नानासाठी खुला करून देण्यात आला.

त्र्यंबकेश्वरी शैवांचे स्नान... रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोलताशांच्या गजरात धर्मध्वजा डौलाने मिरविण्यात आल्या. दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांचे पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान त्र्यंबकेश्वरी सहा तासांनंतर पार पडले.

श्री महंतांवर महापौर अशोक मुर्तडक पुष्पवृष्टी करीत होते. रामकुंडावरील अमृतकुंभाजवळ जलसंपदामंत्री गिरीश महाजन श्री महंतांचे पुष्पहार घालून स्वागत करीत होते. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी सोहळ््याला उपस्थित होते.

Web Title: Lakhs of devotees of Kumbhnan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.