पाणीप्रश्नी पर्यायी व्यवस्थेची बेफिकिरी
By Admin | Updated: July 1, 2016 01:35 IST2016-07-01T01:35:00+5:302016-07-01T01:35:00+5:30
जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे.

पाणीप्रश्नी पर्यायी व्यवस्थेची बेफिकिरी
पुणे : जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे. अवघे २४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे. त्यावेळी पाणी उपलब्धतेच्या पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असताना ते पूर्ण बेफिकीर दिसून येत आहेत. आयुक्त, महापौरांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे आदेश देऊनही त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असणारे अनेक स्रोत शहरात असताना त्याबाबतही प्रशासन पूर्ण अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमध्ये एकूण १.४८ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी नुकतीच या धरणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या रमजानचा सण असल्याने ७ जुलैपर्यंत कोणतीही वाढीव पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापौरांनी प्रशासनाला विहिरींची स्वच्छता करणे, बोअरवेल, पाण्याचे मोठे स्रोत असलेल्या झरे आदींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
शहरामध्ये ३०० विहिरी आहेत, त्या विहिरीत पाण्याची स्वच्छता करून तिथे टँकर भरण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. विहिरीतील हे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी उपयोग आणता येणे सहज शक्य आहे. शहरामध्ये इमारतींचे बांधकाम करताना अचानक पाण्याचे मोठे झरे आढळून आले आहेत. या झऱ्यांमधील पाणी ड्रेनेजमध्ये टाकले जात आहे किंवा ते झरे बुजविण्यात आले आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे. शहराला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. केवळ पाटबंधारे विभाग किती पाणी सोडेल या आशेवर अवलंबून राहण्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाला घेता येणार नाही. शहरामध्ये सप्टेंबर महिन्यापासून पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्याच वेळी पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
>शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जादा दाबाने व पूर्वीपेक्षा जास्त वेळ पाणी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
शहरात मोतीबाग व टिळक रोड येथे पाण्याचे दोन मोठे स्रोत लागले आहेत. मोतीबाग येथून दररोज १० ते १२ टँकर पाणी उचलून ते बागेसाठी वापरले जात आहे, प्रत्यक्षात येथून दररोज २० ते २५ टँकर पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र या पाण्याला फारशी मागणी नसल्याने दहा ते बारा टँकरच पाणी उचलले जात आहे. विहिरीतील पाण्याची अद्याप स्वच्छता केलेली नाही.’’
- व्ही. जी. कुलकर्णी,
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख