मराठी साहित्यविश्वात उत्कटतेची उणीव
By Admin | Updated: May 27, 2015 01:08 IST2015-05-27T01:08:38+5:302015-05-27T01:08:38+5:30
मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो.

मराठी साहित्यविश्वात उत्कटतेची उणीव
पुणे : मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. आज खऱ्या अर्थाने मराठी साहित्यविश्वात ‘उत्कटतेची’ उणीव भासत असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी आयोजित वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर होते.
मंगला गोडबोले यांनी लेखिका या नात्याने स्वानुभवाची शिदोरी रिती करीत लेखकांना लेखनामागच्या प्रपंचाविषयीचे तत्त्वज्ञान सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘साहित्य ही जीवनाची वास्तविक गरज नसते तर ते जीवनाचे ‘बाय’प्रॉडक्ट असते. आपण लिहिण्यासाठी जगत नाही तर समरसून जगण्यासाठी लिहिले तर त्यातील आनंद मिळतो. साहित्यात उत्कटतेची उणीव भासू लागली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छापून येणे खूप सोपे झाले आहे, पण वाचकाच्या मनावर खोलवर छापले जाईल असे लेखन होत आहे का, याचा विचार व्हायला पाहिजे. सुचण्याचा क्षण हा लेखकासाठी श्रीमंतीचा क्षण असतो, तो कुठेही मोजता येत नाही.’’ सुचणं आणि पोहोचणं यासाठी लेखकाने लिहीत राहिलं पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सत्काराला उत्तर देताना अमृता सुभाष हिने पहिल्याच लेखनाला मानाचा पुरस्कार मिळणे हा आनंदाचा क्षण आहे. आत्मशोध घेण्यासाठी अशा शाबासकीच्या थापेची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा सुर्वे यांनी केले, तर आभार सुनील महाजन यांनी मानले. (प्रतिनिधी)
पारितोषिकाचे मानकरी
ग्रंथ पारितोषिक- ल. सि. जाधव, प्रभाकर बागले, डॉ. शिवाजीराव मोहिते, विशाखा पाटील, सुधीर फडके, आ. श्री. केतकर, प्रा. रायभान दवंगे, आनंद अंतरकर, धोंडूजा इंगोले, प्रा. खासेराव शितोळे, डॉ. विजया फडणीस, मुग्धा देशपांडे, श्रीधर नांदेकर, रामकृष्ण अघोर, नयन राजे, लक्ष्मीकांत देशमुख, कलापिनी कोमकली, डॉ. रेखा इनामदार, सहदेव चव्हाण, डॉ. उपेन्द्र किंजवडेकर, राजीव साने, अमृता सुभाष, प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे.
ग्रंथकार पुरस्कार - अभय टिळक, शैला दातार, संगीता जोशी, अशोक बागवे, डॉ. संजय ढोले, प्रा. चंद्रकांत पाटील, इरावती कर्णिक, डॉ. संगीता बर्वे, डॉ. विजया वाड, भानू काळे.