कोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:40 IST2018-04-25T00:40:47+5:302018-04-25T00:40:47+5:30
सत्यशोधन समिती अहवालातून निष्कर्ष; हिंदुत्ववादी गटाचा नाही संबंध

कोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटनेकडून केला होता. खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटाचा हा पूर्वनियोजित कट होता. यामध्ये आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा काहीही संबंध नाही, असा निष्कर्ष सत्यशोधन समितीने तयार केलेल्या अहवालातून काढला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
समितीच्या माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड व इतर सदस्यांनी हा अहवाल तयार केला आहे. विवेक विचार मंचने तो प्रकाशित केला आहे. यावेळी गायकवाड यांच्यासह माजी खासदार प्रदीप रावत उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी अहवालाचे डिजिटल सादरीकरण केले.
गायकवाड यांनी, या हिंसाचारामागील सूत्रधार अनुषंगाने ३१ डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी अशी मागणी केली. एटीएसने जानेवारीत अटक केलेले संशयित माओवादी कोरेगाव भीमाला गेल्याचे व एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव हिंसाचाराचे लागेबांधे आहेत, त्यांची चौकशी करावी असेही ते म्हणाले. खºया अर्थाने पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांना भाजपाची कावीळ
पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहे, मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे. दंगल रोखता न येणे हे स्थानिक पोलिसांचे अपयश असून आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली आहे, असा टोला रावत यांनी लगावला.