मनोरुग्णालय की कोंडवाडा?
By Admin | Updated: November 24, 2014 01:17 IST2014-11-24T01:17:05+5:302014-11-24T01:17:05+5:30
गेल्या १० वर्षांतील सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. तुरु ंगातील कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे.

मनोरुग्णालय की कोंडवाडा?
डॉक्टरांची रिक्त पदे व सोयींचा अभाव : रुग्णांची अवस्था दयनीय
सुमेध वाघमारे - नागपूर
गेल्या १० वर्षांतील सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. तुरु ंगातील कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. धक्कदायक म्हणजे हिवाळ्याच्या दिवसातही मनोरुग्णांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे.
मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र सरकारी अनास्थेमुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना, आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच या खात्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
-रुग्णांची थंड पाण्याने आंघोळ
मनोरुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्चून चार वर्षांपूर्वी सोलर सिस्टिम लावण्यात आली. पुण्याच्या एका कंपनीकडे ही जबाबदारी दिली. परंतु नंतर त्याच्या देखभालीकडे लक्षच देण्यात आले नाही. मागील दोन वर्षांपासून आठ सोलरपैकी फक्त दोनच सुरू आहे. त्यातही गरम पाणी मिळेनासे झाले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लाकडे जाळून गरम पाणी केले जाते, परंतु रुग्णांची संख्या पाहता सर्वांनाच पाणी मिळणे कठीण होते. यामुळे थंडीतही अनेकांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे, तर काही विना आंघोळीनेच राहात असल्याची माहिती आहे.
डॉक्टर, अटेंडन्टची संख्या तोकडी
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात २०१० मध्ये ४१ हजार ८२८ रुग्णांची नोंद झाली होती, २०१३ मध्ये यात ११ हजार १७८ रुग्णांची वाढ होऊन रुग्ण संख्या ५३ हजार ६ वर गेली आहे. यात पुरुषांची संख्या अधिक असून स्क्रि झोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मनोरुग्णालयात ५७० स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, डॉक्टरांपासून ते अटेंडन्ट यांची संख्या तोकडी असल्याने उपचारावर परिणाम होत आहे. रुग्णालयात वर्ग ‘अ’मधील नऊ मनोविकारतज्ज्ञांची पदे मंजूर आहेत, परंतु प्रत्यक्षात वर्ग ‘अ’मधील एक तर उर्वरित चार मनोविकारतज्ज्ञ हे वर्ग ‘ब’मधील आहेत. विशेष म्हणजे, ‘अ’ वर्गातील डॉक्टर हे वैद्यक औषधशास्त्राचे तज्ज्ञ आहे. परंतु मागील काही वर्षांपासून त्यांनी रुग्णांना तपासणेच बंद केले आहे. मनोरुग्णांची देखरेख व देखभाल करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य अटेंडन्टचे आहे. परंतु त्यांची संख्याही फार कमी आहे. मनोरुग्णालयात १८२ पुरुष अटेंडन्टची पदे मंजूर असताना मागील पाच वर्षांपासून ४० पदे रिक्त आहेत.
अपुऱ्या निधीचा फटका रुग्णांना
मनोरुग्णालयाला वर्षाकाठी पाच लाख रुपयांचा निधी मिळतो. यातून रुग्णांना आवश्यक असलेली औषधे उपलब्धे करून दिली जातात. मेयो, मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांच्या विविध तपासण्यांचा खर्चही यातून भागविला जातो. याशिवाय रुग्णांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व क्रीडा महोत्सवाच्या खर्चाचा भारही याच निधीवर पडतो. परिणामी एखाद्या रुग्णाला बाहेरून औषधी देण्याची गरज पडल्यास निधीच्या तुटवड्यामुळे रुग्ण अडचणीत येतो. जून-२०१४ या महिन्यात आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
निधीअभावी पुनर्वसन कार्यक्रम ठप्प
रुग्णालयात ज्या रुग्णाची मानसिक स्थिती सामान्य आहे अशा मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी २०१०-११ मध्ये पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यात आला. सुतारकाम, हस्तकला, बागकाम, आॅईल पेंटिंग, लॅमिनेशन, झेरॉक्स, स्क्र ीन प्रिंटिंग, रोटा प्रिंटिंग, वेल्डिंग, मेणबत्ती बनवणे, औषधांची पाकिटे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. यासाठी शासनाकडून निधी मिळत होता. परंतु २०१४-१५चा निधीच उपलब्ध झाला नाही. यामुळे प्रशिक्षण बंद पडले आहे. रुग्णालयाला २९.९५ लाखांच्या निधीची गरज आहे.