विमानसेवेचा ‘नाद’ कोल्हापूरकरांनी सोडला
By Admin | Updated: February 2, 2015 00:17 IST2015-02-01T23:24:42+5:302015-02-02T00:17:58+5:30
‘टेक आॅफ’ रखडले : चर्चेच्या फेऱ्याही थांबल्या, कोंडी फुटेना

विमानसेवेचा ‘नाद’ कोल्हापूरकरांनी सोडला
कोल्हापूर : दिवसाला येता-जाता एकूण ९५ प्रवासी देण्याची हमी आणि साधारणत: सात हजार रुपये तिकीट दर, अशी विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीची मागणी आहे. याउलट साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर असावा, अशी मागणी स्थानिक उद्योजक, व्यापारी, प्रवाशांची आहे. त्यातच कोल्हापूरच्या विमानसेवेचे ‘टेक आॅफ’ अडले आहे.
लोकप्रतिनिधींचा पुढाकार, उद्योजक-व्यापाऱ्यांसह सेवा देणाऱ्या ‘जेट एअरवेज’ कंपनीची तयारी असूनदेखील विमानसेवा सुरू होण्याची कोंडी फुटत नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना या सेवेचा विसर पडला की काय? असे चित्र आहे.
कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्यादृष्टीने आवश्यक असणारी विमानसेवा पुरविण्यासाठी ‘जेट एअरवेज’ने गेल्या दोन महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी ‘इंडस्ट्रिया २०१४’ या प्रदर्शनात दिली. त्यावर ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने, कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी दररोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी, तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या; पण साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे म्हणणे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला आहे. त्यातूनच सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
‘जेट एअरवेज’कडून कोल्हापूरमध्ये विमानसेवा पुरविण्याची चाचपणी केली. त्यातून कंपनीने तिकीट दर, प्रवासी, आदींची तत्त्वत: निश्चिती केली आहे. विमानसेवेस सहकार्य करण्याची पत्रे कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक, आदी उद्योजकीय संघटनांनी दिली आहेत. कोल्हापूर-मुंबई सेवा पुरविण्याचा परवाना, शिवाय ‘एटीआर’देखील जेट एअरवेजकडे आहे. त्यामुळे प्रवाशांची हमी आणि तिकीट दर निश्चित झाल्यास सेवा सुरू होण्यास हरकत नाही. - एन. एन. अत्तार,
व्यवस्थापक, रसिका ट्रॅव्हल्स
साडेपाच हजार भाडे परवडणारे...
ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ३५०, रेल्वेद्वारे ६५०, तर स्वत:ची वाहने घेऊन शंभरजण दरदिवशी मुंबई-पुण्याला जातात. टोल तसेच अन्य स्वरूपातील खर्च धरता त्यांना त्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. त्या तुलनेत वेळ व आरामदायी असलेल्या विमान प्रवासासाठी साडेपाच हजार रुपये भाडे परवडणारे असल्याचे काही प्रवासी, ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालकांनी सांगितले.