कच्च्या मालाअभावी ‘कोल्हापुरी’ला घरघर
By Admin | Updated: May 8, 2015 00:27 IST2015-05-08T00:23:01+5:302015-05-08T00:27:22+5:30
उद्योग नामशेष होण्याची भीती : चामड्याच्या किमतीत मोठी वाढ; ३५ ते ४० हजार कारागिरांचा प्रश्न

कच्च्या मालाअभावी ‘कोल्हापुरी’ला घरघर
भारत चव्हाण = कोल्हापूर -वेगवेगळ्या कारणांनी कच्च्या मालाचा होत असलेला अपुरा पुरवठा आणि सतत वाढत असलेले चामड्यांचे दर याचा परिणाम ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगावर झाला असून, भविष्यकाळात यावर नियंत्रण न ठेवले गेल्यास कोल्हापुरी चप्पल उद्योग नामशेष होण्याची भीती व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे. सध्या या व्यवसायातील उलाढाल मंदावली असल्याने त्यावर अवलंबून असणारे जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार कारागीर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
जनावरांचे कातडे कमावून त्यापासून कोल्हापुरी चप्पल तयार केले जाते. कोल्हापुरात पूर्वी पारंपरिक पद्धतीने जनावरांची कातडी कमावण्याचे उद्योग होते; पण आता यांत्रिक प्रक्रिया पुढे आली. परंतु ही खर्चिक प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई यांमुळे हे उद्योग बंद पडले. त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना चेन्नई, कोलकाता येथून चामडी आणावी लागत आहेत. स्वाभाविकपणे त्यांच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने चामड्यांचे दर आधीपासूनच वाढले आहेत. चामड्यावर केली जाणारी रासायनिक प्रक्रिया अलीकडील काळात मोठी खर्चिक बनली असल्याने त्याचा परिणाम चामड्याचे दर वाढण्यात होत आहे. गेल्या महिन्यात चामड्यांचे जे दर होते, त्यात तब्बल किलोमागे ३५ ते ४० रुपयांची वाढ झाली.
कच्च्या मालाचे दर वाढल्याने चपलांच्या किमतीही वाढत आहेत. स्वाभाविक चपलांच्या किमती
परवडत नसल्याने ग्राहकांनीही ‘कोल्हापुरी’कडे पाठ फिरविली आहे. पूर्वीसारखी विक्री होत नाही. त्याचा फटका कारागिरांना बसला आहे. कोल्हापुरात ३५ ते ४० हजार कारागीर असून चपलांचा व्यापार करणारे चार ते पाच हजार व्यापारी आहेत. या सर्वांच्या मिळकतीवर परिणाम जाणवू लागला आहे.
कडक नियमांचा फटका
कोल्हापूर शहरात १९९० च्या सुमारास चामडी कमावण्याचे ६८ उद्योग होते. त्यांत एक रासायनिक प्रक्रिया करणारा कारखाना होता. पारंपरिक पद्धतीने चामडी कमावण्याची प्रक्रिया केली जात होती. त्यासाठी हिरडा, बेहडा, चुना व बाभूळ यांचा वापर केला जात होता. मात्र, सांडपाणी पक्रिया केंद्र सुरू करण्याच्या अटीमुळे हे उद्योग शहरातून हद्दपार झाले. काही वर्षांपर्यंत चार उद्योग होते, तेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले. तेथूनच कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडायला सुरुवात झाली.
३५० कोटींची उलाढाल
कोल्हापुरीला असलेली मागणी आणि त्याचा व्यवसाय विस्तार पाहता प्रत्येक महिन्याला २५ ते ३० कोटींचा व्यवसाय कोल्हापुरात होतो. त्याची वार्षिक उलाढाल ३०० ते ३५० कोटींच्या घरात जाते. पूर्वी हीच उलाढाल मोठी होती; परंतु व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना न केल्यामुळे दिवसेंदिवस ही उलाढाल कमी होत आहे, असा जाणकारांचा दावा आहे.
कोल्हापुरी चप्पलला मोठी मागणी
कोल्हापुरी चप्पलला देश-विदेशातील ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या चपलांना त्यामुळे मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, कानपूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, गोवा येथून चांगली मागणी आहे. शिवाय देशाबाहेर इटली, अमेरिका, स्वित्झर्लंड, पॅरिस, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशांतही ‘कोल्हापुरी’ला अधिक मागणी आहे.