कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:34 AM2019-08-08T03:34:48+5:302019-08-08T06:14:40+5:30

लष्कराचे मदतकार्य युद्धपातळीवर; ९४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Kolhapur, Sangli floods wreak havoc; 3 villages in the city | कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

googlenewsNext

कोल्हापूर/सांगली/मुंबई : पंचगंगा, कोयना, वारणा, कृष्णा या पश्चिम व दक्षिण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील सुमारे ४५० गावे महापुराच्या वेढ्यात अडकली आहेत, तर चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे ९४ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मदतकार्य वेगात सुरू असून चार विमाने व दोन हेलिकॉफ्टर दाखल झाली आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २0४ गावे पंचगंगा नदीच्या महापुरात अडकली आहेत. लष्कराच्या मदतीने ६0 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असले, तरी करवीर तालुक्यातील चिखली गावांत २ हजार लोक अडकले आहेत. पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.४ फूट होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा तब्बल १३ फुटांवरून वाहू लागल्याने अक्षरश: जलप्रलय झाला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापुरात एनडीआरएफची २२ पथके आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानांद्वारे पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्याची विनंती केली.

सांगली जिल्हा निम्मा पाण्यात
कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरांनी सांगली जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, नदीकाठची हजारो लोकवस्ती पाण्याखाली गेली आहे. महापुराने निम्मे सांगली शहर कवेत घेतले आहे. सांगलीत सायंकाळी पाच वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ५५.४ फुटांवर पोहोचली होती. सांगली जिल्ह्यातील ५३ हजारांवर लोकांचे, तर १६ हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असून, हजारो लोक महापुरात अडकूनच आहेत. पुणे जिल्ह्यात शहरासह ६४ गावे पुराने प्रभावित झाली असून, सुमारे ३,३४३ लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. रायगड जिल्ह्यात ८ तालुके बाधित असून, सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. सुमारे तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ धरणे १०० टक्के भरली आहेत. पुरामुळे १३ गावे बाधित झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक विसर्ग सुरू असून, सर्व धरणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा
मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये, तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न-धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

Web Title: Kolhapur, Sangli floods wreak havoc; 3 villages in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.