Devendra Fadnavis ( Marathi News ) :कोल्हापूर, सांगलीमधील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या संदर्भात कोल्हापूरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांसोबत चर्चा करुनच शक्तिपीठ महामार्गाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. वर्धाच्या सेवाग्रामहून तो सुरू होणार असून १२ जिल्ह्यातून हा रस्ता जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग यातून माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई, परळी वैद्यनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, नरसोबाचीवाडी, गाणगापूर ही तीर्थस्थळे आपण जोडणार आहे. हा शक्तीपीठ मार्ग फक्त तीर्थस्थळासाठी नाही तर या महामार्गामुळे मराठवाड्याचा औद्योगिक विकास होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
"समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग असा त्रिकोण तयार होणार आहे. या महामार्गामुळे कनेक्टिविटी मिळणार आहेत. हा फक्त महामार्ग नाही तर राज्याच्या प्रगतीचं इंजिन ठरणार आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोल्हापूरातील शेतकऱ्यांनी भेट घेतली
कोल्हापूरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कोल्हापूरातील ५ तालुक्यातील २०० शेतकरी माझ्याकडे आले होते, हजार शेतकऱ्यांनी आम्हाला शक्तिपीठ महामार्ग हवाय अशा सहीचे पत्र दिले आहे. सांगलीपर्यंत या महामार्गाला विरोध नाही. कोल्हापूरातील समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकरी परिषद घेऊ असंही म्हटलं आहे. आपण पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधूनच हा महामार्ग तयार करू, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिली.