सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:54 PM2019-09-07T14:54:59+5:302019-09-07T15:40:54+5:30

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे.

Kolhapur district president Satej Patil | सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

Next
ठळक मुद्देसतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील घडामोडींना वेग

कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामधील घडामोडींना वेग आला आहे. तूर्त काही दिवसांसाठी सुरेश कुराडे किंवा गुलाबराव घोरपडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जावी, असा मतप्रवाह होता.

प्रदेश काँग्रेसकडूनही त्यासंबंधी कुराडे यांना विचारणा झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने कायमस्वरूपी जिल्हाध्यक्षपद नेमण्याचा निर्णय अखेर पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरुन सतेज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पत्र सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी जाहीर केले आहे.

पी. एन. पाटील यांच्यानंतर बराच प्रतिष्ठेचा मुद्दा करून जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आवाडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी फक्त सात महिनेच या पदावर काम केले. साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षाने महिन्यात राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला आवाडे यांच्या राजीनाम्याचा हादरा बसला आहे.

पाठोपाठ रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनाही अंतर्गत वादामुळे डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी अ‍ॅड. विजय भोसले यांची नियुक्त करण्यात आली आहे.

पी. एन. पाटील हे सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीला वेळ द्यायचा असल्याने त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपद घेण्याची तयारी नव्हती, त्यामुळे आता या पदासाठी सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय काँग्रेसकडे नव्हता.

आमदार सतेज पाटील हे तरुण आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची भक्कम यंत्रणा आहे. निवडणुकीत उमेदवारांना ते चांगली ताकद देऊ शकतात. शिवाय ते विधानसभा निवडणूकही लढवणार नसल्याने या कामासाठी वेळही देऊ शकतात. या सर्वांचा विचार होऊन त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे.
 

 

Web Title: Kolhapur district president Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.