लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम दिला होता, ‘आता तुमच्यासह माझ्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झाले पाहिजे.’ त्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला असून, आमचे पीएस, ओएसडीसुद्धा मुख्यमंत्रीच ठरवितात. आमच्याही हातात आता काही राहिले नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावेच लागेल, असा खुलासा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केला.
बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत कोकाटे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सरकारसोबत सांगड घालून काम केल्यास स्थैर्य व शाश्वती निर्माण होईल. मी बाजार समित्यांना कमी लेखत नाही. याच समित्यांमुळे अनेकजण आमदार, खासदार झाले. राजकारणाचे भविष्य तुमच्या हातात आहे. सरकार निर्माण करण्याचे काम समित्या करत असतात. तुमच्यात क्षमता असून, ती कामाला लावून जास्तीत जास्त लोकाभिमुख काम करा. जनतेच्या आशीर्वादाने बहुमताचे सरकार आले आहे. शिंदेसेनेचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे कोकाटे म्हणाले.