रम्य आठवणीत रंगलेला किशोर के कुमार
By Admin | Updated: August 12, 2014 01:07 IST2014-08-12T01:07:16+5:302014-08-12T01:07:16+5:30
सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या गीतांची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. त्यामुळेच त्यांची गीते ऐकण्याचा योग येतो तेव्हा रसिक हा योग चुकवत नाहीत. त्यात किशोरकुमार यांच्या

रम्य आठवणीत रंगलेला किशोर के कुमार
नागपूर : सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या गीतांची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. त्यामुळेच त्यांची गीते ऐकण्याचा योग येतो तेव्हा रसिक हा योग चुकवत नाहीत. त्यात किशोरकुमार यांच्या मुलांकडूनच त्यांची गीते ऐकण्याचा योग नागपूरकरांनी रविवारी अनुभवला. किशोर कुमार यांच्या जीवनातील अनेक आठवणी, त्यांच्या रेकॉर्डिंगच्या प्रसंगातल्या गमतीजमती आणि त्यांचे हरफनमौला वागणे. यासह किशोरकुमार यांच्या अमीट गोडीच्या गीतांचे सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम रंगला. किशोरदांवर प्रेम करणारे रसिक, लोकप्रिय गीतांचे सादरीकरण आणि रसिकांची दाद घेत हा कार्यक्रम नागपूरकर रसिकांसाठी अविस्मरणीयच ठरला.
लो कमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेण्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पियुषकुमार शर्मा, एसबीआयचे सिनिअर मॅनेजर तलवार, रॉयल डेव्हलपर्सचे अरुण श्रीवास्तव, अमित कुमार, सुमितकुमार, चंद्रा सान्याल, हार्मोनीचे राजेश समर्थ , सिनिअर इन्स्पेक्टर अशोक बागुल, सोनाली धोंडरकर, रोटरी क्लबचे अभिमन्यू चावला यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती राजेश समर्थ यांची होती. प्रारंभ लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या निवेदनाने झाला. त्यानंतर कार्यक्रमाची संकल्पना राजेश समर्थ यांनी सांगितली.
किशोरकुमार यांची मुले अमित आणि सुमित यांना ऐकण्यासाठी रसिक आतूर होते. कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला. अमितकुमार यांनी प्रेक्षकांचे हे अभिवादन स्वीकारले आणि नागपूरकर रसिकांनी किशोरदा आणि आमच्यावर खूप प्रेम केले, असे सांगतानाच थेट किशोरकुमार यांच्या आठवणींना हात घातला. किशोरदा आमच्यासाठी केवळ वडीलच नव्हे तर आमचे गुरू होते. गेली ४५ वर्षे मी वडिलांची गीते सादर करतो आहो आणि जगतो आहो. पण त्यांच्या गीतांचे माधुर्य आणि लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. या कार्यक्रमाला झालेली ही गर्दी त्याचेच द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी ‘शर्मिली’ चित्रपटातले एस.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले ‘खिलते है गुल यहा खिलके बिछडने को...’ हे गीत सादर केले आणि किशोरकुमार यांची आठवण ताजी झाली. काही गीते अमित कुमार यांनी सादर केल्यावर काही गीते सुमितकुमार यांनी सादर केली.
यात अमित कुमार यांनी किशोरकुमार यांच्या आठवणी सांगत आणि गीतांचे प्रसंग, संदर्भ सांगताना गीत सादर केल्यामुळे रसिक प्रत्येक गीताशी नव्याने रिलेट होत होते. गीतांच्या मागचे संदर्भ किशोरदांवर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठीही नवे होते. किशोर कुमार म्हणजे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंत, गायक. निर्माता म्हणून त्यांच्यावर खूप जास्त टॅक्स लावला गेला होता. या टॅक्सपासून वाचविण्यासाठी त्यांनी एखादा फ्लॉप सिनेमा तयार करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी ‘दुर गगन की छाव मे..’ हा चित्रपट तयार केला पण नेमका हा सिनेमा खूप चालला. आपला सिनेमा चालावा म्हणून निर्मात्यांचा प्रयत्न असतो पण हा सिनेमा चालल्यावर मात्र किशोरदांनी स्वत:च्या कपाळावर हात मारून घेतला होता.
याप्रसंगी अमित यांनी या चित्रपटातले ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...अजनबी तुम जाने पहचाने से लगते हो...बेकरारे दिल अरे तू गाये जा...हर कोई चाहता एक मुठ्ठी...’ ही गीते खास किशोरकुमार यांच्या शैलीत सादर केली. त्यानंतर ‘जय जय शिवशंकर...’ हे गीत त्यांनी आकांक्षा नगरकरसह सादर करून माहोल केला.
त्यानंतर सुमित कुमार यांनी ‘फिर वो ही शाम है... मेरी सोनी मेरी सोनिये... चला जाता हूं किसी की धुन मे... ओम शांती ओम...’ या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला. तर अमित कुमार यांनी ‘कोई हमदम ना रहा... ये जो मोहब्बत है... रूप तेरा मस्ताना... भिगी भिगी रातो मे... एक लडकी भिगी भागी सी... हम बेवफा हरगीज ना थे...’ ही गीते सादर केली. त्यानंतर सुमित यांनी ‘जिंदगी एक सफर है सुहाना... ये जवानी है दिवानी...एक मै और एक तू... बचना ए हसिनो...’ आदी गीतांनी कार्यक्रम रंगविला.
आणि रूप तेरा मस्ताना या गीताची चाल बदलली...
एकदा एस.डी. बर्मन यांनी मला एका गीतासाठी बोलाविले. त्या गीताची चाल एस.डी. बर्मन यांनी लावली होती. त्यांच्यावर त्यावेळी सहगलचा प्रभाव होता आणि त्यांनी या रोमॅण्टिक गीताचे खोबरे करून ठेवले होते. त्यावेळी किशोरकुमार आणि शक्ती सामंत यांनाही ती चाल आवडली नाही. किशोरकुमार यांनी एस.डी. यांना त्यांच्याच एका बांगला गीताची चाल ऐकविली आणि त्यावर हे गीत आधारलेले असावे, असे सुचविले. त्यावेळी तेथे राजेश खन्ना होते. त्यांनाही किशोरदांचीच चाल आवडली आणि रूप तेरा मस्ताना हे गीत जन्माला आले. यावेळी अमितकुमार यांनी दोन्ही चाली ऐकविल्या तेव्हा प्रेक्षकांची हसता-हसता पुरेवाट झाली. अशा अनेक आठवणींनी हा कार्यक्रम रंगतदार झाला.