रक्तगट वेगळे असूनही झाले किडनी प्रत्यारोपण
By Admin | Updated: March 14, 2015 05:44 IST2015-03-14T05:44:43+5:302015-03-14T05:44:43+5:30
एकच रक्तगट असल्यास किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. पण, रक्तगट वेगळे असतानाही केलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

रक्तगट वेगळे असूनही झाले किडनी प्रत्यारोपण
मुंबई : एकच रक्तगट असल्यास किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. पण, रक्तगट वेगळे असतानाही केलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते. ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञानात किडनी लाभार्थ्याचे रक्त फिल्टर करून प्लाझ्मामधील अॅण्टीबॉडीज् कमी केल्या जातात. यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे शरीर किडनीला स्वीकारते. ओमप्रकाश शर्मा यांच्या पत्नीची सुमन शर्मा यांची किडनी ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञान वापरून देण्यात आली आहे.
ओमप्रकाश शर्मा यांना एप्रिल २०१३ साली किडनीचा त्रास सुरू झाला होता. सायंकाळी त्यांना थोडा थोडा ताप यायचा. तपासण्या केल्यावर काहीही आढळले नाही. त्यानंतर रुग्णालयात जाऊन तपासण्या केल्या. नेफ्रॉलॉजिस्टकडून औषध घेतल्यावर थोडे बरे वाटले. परदेशात जाऊन आलो. नोव्हेंबर २०१३मध्ये परत त्रास जाणवू लागला. रुग्णालयात दाखल झालो. पण काही दिवासांनी तपासण्या केल्यावर कळले की किडनीचा आजार वाढला आहे. यामुळे डायलेसिस अथवा किडनी प्रत्यारोपण असे दोनच पर्याय होते. पण, माझा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ आहे, आणि घरातल्या सर्वांचा ‘ए पॉझिटिव्ह’ आहे. मग, प्रतीक्षा यादीत नाव घातले. तेव्हा ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांना भेटलो. त्यांनी ग्लोयकोसॉर्बचा पर्याय सुचवला.
२४ डिसेंबर २०१४ रोजी माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता मी पुन्हा नोकरीला जातो, असे ओमप्रकाश यांनी सांगितले. प्रत्यारोपण करताना प्रामुख्याने रक्तगट तपासला जातो. कारण, रक्तगट वेगळा असल्यास रक्तातील अॅण्टीबॉडीज् प्रत्यारोपण केलेली किडनी स्वीकारत नाहीत.
सुमन व ओमप्रकाश यांचा रक्तगट वेगळा होता. तेव्हा ग्लायकोसॉर्ब तंत्रज्ञान वापरले. ओमप्रकाश यांच्या अॅण्टीबॉडीज् वाढल्या नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे.
आता त्या दोघांची प्रकृती उत्तम आहे, असे ग्लोबल रुग्णालयाचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. भरत शहा यांनी सांगितले.