खोतकर-दानवे वाद औरंगाबादेतच मिटणार? 'मातोश्री'वरील बैठक निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:41 IST2019-03-16T17:38:05+5:302019-03-16T17:41:07+5:30
जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे.

खोतकर-दानवे वाद औरंगाबादेतच मिटणार? 'मातोश्री'वरील बैठक निष्फळ
मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये जालन्याच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे.
या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धाव ठाकरे, महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे यावर उद्या रविवारी औरंगाबादेत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज उद्धव ठाकरे, खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून काहीही निष्फळ झाले नाही. उद्या औरंगाबाद युतीचा संयुक्त मेळावा आहे. या मेळाव्याआधी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेळाव्याआधी एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात औरंगाबाद येथे एक बैठक होणार आहे.
दरम्यान, याआधी अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला होती. त्यानंतर उद्धव यांनी अप्रत्यक्ष निर्णय देताना खोतकर यांना पंकजा मुंडे यांच्यासोबत मराठावाडा समन्वयकपदी नियुक्त केले होते. परंतु अर्जुन खोतकर यांनी निर्णय मान्य नसल्याचे सांगत, पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातच त्यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सत्तार यांनी देखील खोतकर यांच्याकडून लवकरच गूड न्यूज मिळेल असे म्हटले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यामुळे आज मातोश्रीवर तातडीने बैठक घेण्यात आली होती. दरम्यान रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच अर्जुन खोतकर यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.