खरीप धोक्यात!

By Admin | Updated: June 30, 2016 01:37 IST2016-06-30T01:37:51+5:302016-06-30T01:37:51+5:30

या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे.

Kharip danger! | खरीप धोक्यात!

खरीप धोक्यात!


पुणे : या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आजपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने वेळोवेळी वर्तवलेल्या आंदाजानुसार चांगला पाऊस या वर्षी पडेल, असे सांगितले गेले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. कृषी विभागानेही तयारी करून तालुक्यानुसार बैैठका घेऊन नियोजन सांगितले. मात्र, गेला महिनाभर पाऊस हुलकावणीच देत आहे. सुरुवातीला भात उत्पादकांनी धूळवाफेवर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच येत नसल्याने त्या वाया जातात की काय, असा पेच निर्माण झाला होता. पण, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काहीसा पाऊस झाल्याने त्या पेरण्या वाचल्या. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी पेरण्या कराव्या की नाही, अशा विवंचनेत सापडला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी तो २२७.२१ मिलिमीटर झाला होता. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाला निम्मी सरासरी गाठता आली नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
पाऊस हुलकावणी देत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत उसासह फक्त ४.३७ टक्के इतक्यात क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
सर्वाधिक पाऊस इंदापूरला
१ जून पासून जिल्ह्यात आतापर्र्यत सर्वाधिक पाउस इंदापूर तालुक्यात झाला असून तो १५७.७0 मिलीमीटर इतका आहे. तर त्यानतर वेल्हे तालुक्यात १0८.७0, मुळशी तालुक्यात १0८.७0 तर मावळ तालुक्यात १0५.३0 मिलीमीटर इतका पाउस झाला आहे. तर सर्वात कमी हवेलीत २७.१0 तर आंबेगावमध्ये ३६.९0 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
भात उत्पादक चिंतेत
खरीप हंगामात भात हे पीक सर्वाधिक सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. या वर्षीच्या नियोजनात ५५ हजार हेक्टरवर ते घेण्याचे ठरविले होते. जून महिन्यात भाताचा जवळपास १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतात; मात्र या वर्षी सरासरीच्या फक्त ७२९.५ हेक्टरवरच पेरण्या झाल्या असून, ती टक्केवारी ४.८ इतकीच आहे. पावसाची कृपा झाली नाही, तर यंदा भात उत्पादकांवरही संकट येण्याची शक्यता आहे.

Web Title: Kharip danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.