खामगाव अर्भक अपहरण, घटस्फोटाच्या भीतीने बाळाच्या खरेदीचा व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:14 IST2017-10-03T03:14:33+5:302017-10-03T03:14:41+5:30
पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा व्यवहार केला. यातूनच उपजिल्हा रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

खामगाव अर्भक अपहरण, घटस्फोटाच्या भीतीने बाळाच्या खरेदीचा व्यवहार
अनिल गवई
खामगाव (जि. बुलडाणा) : पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा व्यवहार केला. यातूनच उपजिल्हा रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबरच्या पहाटे एका बुरखाधारी महिलेने नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीन
या महिलेचे नवजात बाळ पळवून नेले होते.
या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर तिसºया दिवशी सिल्लोड येथून महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पाचव्या दिवशी अपहृत बाळ दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले.
या बाळाचा अपहरणकर्त्यांनी दिल्ली येथील मल्लिका हिंमत खान या महिलेशी ३५ लाखांत सौदा केला होता. मल्लिकाला मूलबाळ होत नसल्याने तिचा दुबईस्थित पती हिंमत खान याने घटस्फोटाची धमकी दिली होती. त्यामुळे तिने बाळ खरेदी करण्याचे ठरविले. यासाठी रेबिका पिल्ले (प्रीतीची आई, रा. खामगाव) या महिलेशी बाळखरेदीचा सौदा केला.
त्यानुसार रेबिकाने स्थानिक सामान्य रुग्णालयातून सुमय्याचे बाळ पळवून ते मल्लिकाला विकले. आरोपी प्रीती हिने मोहसीन हुसैन खान याच्याशी वर्षभराच्या प्रेमसंबंधातून दुसरे लग्न केलेले असून, तिच्या पतीचीही या प्रकरणात साथ मिळाली.
‘तिने’ फिरविला शब्द
मल्लिकाला बाळ देण्यासाठी रेबिकाने शहरातील (काल्पनिक नाव) बबिता नामक महिलेशी सौदा केला होता. तिला प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालयात भरतीही केले; मात्र तीन मुलीनंतर चवथ्या वेळेस मुलगा झाल्याने तिने शब्द फिरविला. त्यामुळे रेबिकाने दुसरे बाळ शोधले.
पतीला संशय येऊ नये व आपलेच बाळ वाटावे यासाठी मल्लिकाने सुंदर व गुटगुटीत बाळच पाहिजे, अशी अट घातली होती. त्यामुळे रेबिकाने पहिल्यांदा दाखविलेले अन्य महिलेचे बाळ मल्लिकाने नापसंत केले व सुमय्याचे बाळ फोटोवरून पसंत करून ते आणण्यास सांगितले.