केरळचे दोडामार्ग कनेक्शन धोकादायक
By Admin | Updated: July 24, 2015 00:56 IST2015-07-24T00:56:06+5:302015-07-24T00:56:34+5:30
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर : गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे आश्रयस्थान

केरळचे दोडामार्ग कनेक्शन धोकादायक
वैभव साळकर -दोडामार्ग -महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सरहद्दीवर वसलेला दोडामार्ग तालुका परराज्यातील गुन्हेगारांना सोयीचे आश्रयस्थान वाटू लागला आहे. गेल्या काही वर्षात केरळमधील खून, तस्करी आणि अंमली पदार्थ विक्रीत गुुंतलेल्या गुन्हेगारांना दोडामार्ग तालुक्यातून अटक करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे केरळीयनांचे सिंधुदुर्ग आणि पर्यायाने दोडामार्ग कनेक्शन भविष्यात जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका म्हणून दोडामार्गची निर्मिती झाली. पश्चिमेला गोवा, पूर्वेला कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सरहद्दीवरील हा तालुका भौगोलिकदृष्ट्या खडतर आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत दोडामार्गची निर्मिती झाली आहे. कृषीक्षेत्रासाठी अनुकूल परिस्थिती याठिकाणी असल्याने पराज्यातील लोकांनीसुद्धा तालुक्यात शेतीसाठी शिरकाव केला आहे. केरळीयन लोकही त्याला अपवाद नाहीत. गेल्या दहा वर्षात तालुक्यात केरळीयनांचे प्रस्थ चांगलेच वाढले आहे. केळी, अननस आणि रबर लागवडीच्या नावाखाली केरळीयनांनी इथल्या डोंगरदऱ्यांमधील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन तालुक्यात शिरकाव केला आहे. केरळीयनांच्या या वाढत्या प्रस्थाला अनेकवेळा शिवसेनेने विरोध केला. मध्यंतरीच्या काळात सेनेने पुंगी बजाव, लुंगी हटाव मोहीम हाती घेतली. मात्र, त्यावेळी प्रांतवादाच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच पेटले होते. कालांतराने केरळीयन लोकांचाच तालुक्यातील गांजा लागवडीत हात असल्याचे समोर आले. त्याला अटकही झाली आणि केरळीयनांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुढे आली. काही दिवसांनी केरळ राज्यातील कम्युनिस्ट नेते टी. चंद्रशेखरराव रेड्डी यांची हत्या झाली. ही बातमी अनेक वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाली. मात्र, त्या हत्येमागील मुख्य आरोपी फरार होता. काही दिवसांनंतर हाच आरोपी दोडामार्ग तालुक्यात भेडशी याठिकाणी येऊन लपून बसल्याचे समोर आले. केरळ पोलिसांकडून त्याला अटकही झाली आणि पुन्हा केरळीयनांच्या वाढत्या प्रतापांबाबत चर्चा सुरू झाली.
दोन दिवसांपूर्वी भिकेकोनाळ येथे केरळीयनाने केलेल्या आत्महत्येमागेही ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले. त्याठिकाणी हस्तीदंत तस्करीत गुंतलेला मुख्य आरोपी हा आत्महत्या करणारा व्यक्ती होता, हे स्पष्ट झाले. त्यामुळे केरळीयनांच्या सिंधुदुर्ग कनेक्शनविषयी तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. ठराविक कालावधीनंतर गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केरळीमधील मुख्य आरोपींना अटक झाल्याने तालुक्यातील केरळीयनांचे वाढते प्रस्थ आता धोकादायक ठरू लागले आहे. तिलारी खोऱ्यातील बहुतांशी जमिनी या सध्या केरळीयनांच्या ताब्यात आहेत. ज्याठिकाणी स्थानिक शेतकरी पोहोचू शकत नाहीत, अशा अवघड दुर्गम ठिकाणी केरळीयन लोकांनी जावून मेहनत व चिकाटीच्या जोरावर रबर व अननसाच्या बागा फुलविल्या आहेत. त्यांची ही मेहनत नक्कीच आदर्श घेण्यासारखी आहे. परंतु त्याचबरोबर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही विचार करायला लावणारी आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आलेख गुन्हेगारीच्या बाबतीत फारच कमी आहे. मात्र, गुन्हेगारी पार्र्श्वभूमीच्या केरळीयन लोकांमुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतीमागे दडलंय काय?
तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीत परप्रांतीय केरळीयन लोकांनी रबर लागवड केली आहे. मात्र, याठिकाणी अंमली पदार्थांची लागवड झाल्याचा आरोप होतो आहे. पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, पुन्हा अंमली पदार्थ विक्री प्रकरणात गुंतलेल्या लोकांनी आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मनुष्यवस्तीपासून दूरवर असलेल्या या भागात शेतीच्या निमित्ताने घेतलेल्या जमिनीत कोणती लागवड करण्यात आली, हे तपासणे गरजेचे आहे.