कारागृहातून बाहेर पडताच केली चोरी
By Admin | Updated: August 4, 2016 22:34 IST2016-08-04T22:34:17+5:302016-08-04T22:34:17+5:30
कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर

कारागृहातून बाहेर पडताच केली चोरी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ - कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर ही रक्कम तो उधळू लागला अन् त्याचमुळे तो गुन्हेशाखेच्या हातात सापडला. शूभम उर्फ अब्दूल ललित यादव (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. तो धंतोलीतील कुंभारटोलीत, गजानन मंदीराजवळ राहतो.
आरोपी यादव अट्टल गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याची आत-बाहेर अशी जेलयात्रा सुरूच राहते. एका गुन्ह्यातून तो २७ जुलैला कारागृहातून सुटून बाहेर आला. त्यानंतर त्याच्या डोक्यात गुन्हेगारीचा किडा वळवळू लागला. वर्धा मार्गावरील हल्दीराम समोर जागृत हनुमान मंदीर आहे. येथे चोरी केल्यास मोठी रक्कम हाती लागेल, असा अंदाज बांधून त्याने ३१ जुलैच्या रात्री मंदीराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर आत असलेल्या तीन दानपेट्या फोडून यादवने १० ते १५ हजारांची रक्कम लंपास केली. एवढेच नव्हे तर यशवंत स्टेडिअमजवळून एक स्कुटीही (एमएच ३४/ जे ५७३४) चोरली.
उधळपट्टी नडली
कारागृहातून नुकताच बाहेर पडलेला यादव रक्कम उधळत असल्याची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यादवकडे नजर रोखली. बुधवारी त्याला जेरबंद करून बोलते केले असता त्याने मंदीरातील दानपेटी तसेच स्कुटीचोरीची कबुली दिली. ती जप्त केल्यानंतर त्याला गुन्हेशाखेच्या पथकाने धंतोली पोलिसांच्या हवाली केले. पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर तांदुळकर, हवलदार सुखदेव मडावी, महादेव सातपुते, राजू डांगे, धर्मेंद्र सरोदे, नायक रविंद्र राऊत आणि गोविंद देशमुख यांनी ही कामगिरी बजावली.