मुंबई : मद्यविक्री वगळता राज्यातील इतर सर्व दुकाने २४ तास उघडी ठेवता येतील. दुकाने उघडी ठेवण्याबाबतच्या आधीच असलेल्या या नियमाबाबत स्पष्टता आणणारे परिपत्रक राज्य सरकारने बुधवारी जारी केले. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा’मध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने विशिष्ट वेळेतच उघडी ठेवता येतील, अशी कोणतीही तरतूद नाही. मात्र, बऱ्याचदा स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा त्यासाठी वेळ घालून देतात आणि त्या वेळेनंतर दुकाने उघडी ठेवली तर ती बंद करण्यास भाग पाडतात. त्यामुळे राज्याच्या कामगार विभागाने स्पष्टता आणणारे परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकात असेही स्पष्ट केले आहे की, व्यावसायिक प्रतिष्ठाने आठवड्यातून एक दिवस बंद ठेवली पाहिजेत, असा कोणताही नियम नाही. सातही दिवस ती उघडी ठेवता येतील. मात्र नोकर, कामगारांना आठवड्यातून पूर्ण एक दिवस (२४ तास) सुट्टी द्यावी लागेल.
तक्रारी आल्या म्हणून...व्यावसायिक प्रतिष्ठाने अमक्या वेळेतच सुरू ठेवावीत, असे कोणतेही बंधन नसताना विशिष्ट वेळेनंतर ती सुरू ठेवण्यास मनाई केली जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे परिपत्रक काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही कामगार विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.
चित्रपटगृहांनाही वेळबंधन नाही पूर्वी चित्रपटगृहे कोणत्या वेळेत सुरू ठेवावीत, याचे नियमबंधन होते. मात्र, १९ डिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना काढून हे बंधनही हटवण्यात आले. त्यामुळे चित्रपटगृहेही २४ तास सुरू ठेवता येऊ शकतात, असेही कामगार विभागाने स्पष्ट केले आहे.
दारुविक्री दुकानांबाबत? मद्यविक्री करणारी दुकाने, बिअरबार, परमिट रूम, हुक्का पार्लर यासाठी वेळेचे अधिनियमात असलेले बंधन यापुढेही कायम राहणार आहे, असेही कामगार विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
Web Summary : Maharashtra shops, excluding liquor stores, can operate 24/7. The labor department clarified existing rules, removing time restrictions. Employees must have a 24-hour weekly holiday. Movie theaters also have no time restrictions.
Web Summary : महाराष्ट्र में शराब की दुकानों को छोड़कर, अन्य सभी दुकानें 24 घंटे खुली रह सकती हैं। श्रम विभाग ने समय प्रतिबंध हटाते हुए नियमों को स्पष्ट किया। कर्मचारियों को साप्ताहिक 24 घंटे की छुट्टी मिलनी चाहिए। सिनेमाघरों पर भी समय की पाबंदी नहीं है।