रस्त्याने तरी चालू द्या!
By Admin | Updated: April 6, 2017 02:15 IST2017-04-06T02:15:16+5:302017-04-06T02:15:16+5:30
राजकीय पक्षांची कार्यालये थाटण्यासाठी संपूर्ण फुटपाथच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काबीज केल्याचे चित्र सध्या चेंबूर परिसरात दिसून येत आहे

रस्त्याने तरी चालू द्या!
मुंबई : पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर राजकीय पक्षांची कार्यालये थाटण्यासाठी संपूर्ण फुटपाथच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काबीज केल्याचे चित्र सध्या चेंबूर परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही चालायचे तरी कसे? असा सवाल सामान्यांनी उपस्थित केला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा समावेश असल्याने कोणीही याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यास पुढे आलेले नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या मात्र ही बाब लक्षात येऊनही यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
एकीकडे चेंबूर परिसरात नागरिकांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालणे पादचाऱ्यांना कठीण बनते. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनीही फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. त्यात भर म्हणून की काय, चेंबूरच्या गोल्फ क्लबसमोरील रस्त्यावर आणि आरसीएफ तलावाजवळ संपूर्ण फुटपाथ राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काबीज केला आहे. या ठिकाणी रिकाम्या जागेवर सेना, रिपाइं, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपापले झेंडे उभारून जागा अडवून ठेवली आहे. तर काहींनी या ठिकाणी अनधिकृत कार्यालये आणि दुकानेदेखील थाटली आहेत. ही दुकाने महिना ५ ते १० हजार रुपये भाड्याने देण्याचे उद्योग राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजरोसपणे करत आहेत. विशेष म्हणजे या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत पुरावे नसताना विजेचे मीटरदेखील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणांत सगळेच राजकीय पक्ष सामील असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. मात्र एखाद्या फेरीवाल्याने अशा प्रकारे जागा अडवली असती तर त्यावर पालिकेने तत्काळ कारवाई केली असती, असे एका फेरीवाल्याने बोलून दाखविले. नागरिकांनी मात्र या सगळ्या प्रकारावर पालिकेने तत्काळ कारवाई करून फुटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले करावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
>अधिकृत विजेचे मीटर
विशेष म्हणजे या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत पुरावे नसताना विजेचे मीटरदेखील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणांत सगळेच राजकीय पक्ष सामील असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही.