‘केबीसी’मुळे अख्खे गाव देशोधडीला!
By Admin | Updated: July 19, 2014 02:16 IST2014-07-19T02:16:56+5:302014-07-19T02:16:56+5:30
एक बांधकाम मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला.

‘केबीसी’मुळे अख्खे गाव देशोधडीला!
विनोद काकडे, औरंगाबाद
एक बांधकाम मिस्त्री, ज्याची दुचाकी घेण्याची ऐपत नव्हती तो ‘केबीसी’मुळे आलिशान चारचाकीत फिरू लागला. फॉरेनच्या ट्रीपला जाऊ लागला... तो हे करु शकतो तर आपण का नाही? या (अ)विचारातून एकेक करून अख्खे गाव केबीसीच्या जाळ्यात अडकले. कुणी शेती, कुणी दागिने विकून गुंतवणूक केली, तर कुणी गुंतवणुकीसाठी इतर मालमत्ता सावकाराकडे गहाण ठेवली. केसीबीने गाशा गुंडाळल्याने अख्खे गाव देशोधडीला लागले. स्वत: तर बरबाद झालेच झाले आपल्याबरोबर हजारो मित्र, नातेवाईकांनाही त्यांनी ‘केबीसी’च्या नादी लावून देशोधडीला लावले.
पैठण तालुक्यातील मावसगव्हाण, हे ते गाव. औरंगाबादपासून ३५ किलोमीटरील आडवळणाला असलेले दीडशे उंबऱ्यांचे हे गाव. जायकवाडी धरण जवळच असल्यामुळे गाव तसे सधनच. शेती हेच बहुतांश कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन. सर्व काही सुरळीत होते. दोन वर्षांपूर्वी गावातील सुरेश संपत जाधव हा ‘केबीसी’ची योजना घेऊन गावात आला. सुरेश हा पाटबंधारे खात्यात नोकरीला आहे.