सखींनी केले कॅटवॉक अन् धम्माल नृत्य
By Admin | Updated: August 15, 2014 00:44 IST2014-08-15T00:44:02+5:302014-08-15T00:44:02+5:30
सखींच्या उत्साहाला आलेले उधाण...विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची धडपड...नटून, थटून गजरा लावून आलेल्या सखींमुळे वातावरणात एक उन्मादक सुगंध होताच.

सखींनी केले कॅटवॉक अन् धम्माल नृत्य
सोनाली कुळकर्णीने साधला संवाद : लोकमत सखी मंच आणि राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम
नागपूर : सखींच्या उत्साहाला आलेले उधाण...विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची धडपड...नटून, थटून गजरा लावून आलेल्या सखींमुळे वातावरणात एक उन्मादक सुगंध होताच. त्यात प्रत्येक सखीला आपले सादरीकरण करण्याची उत्सुकता...प्रचंड उर्जा असलेल्या सखींनी कधी रॅम्पवर कॅटवॉक करून तर कधी धम्माल नृत्याचे सादरीकरण करून अख्खा दिवस आज डोक्यावर घेतला. कुठलाही मुलाहिजा न बाळगता सखी आज मोकळ्या झाल्या...आपल्यातील कला कौशल्याला त्यांनी मनसोक्त वाट मोकळी करून दिली आणि इतरांच्या सादरीकरणाला मनमोकळी दादही दिली.
लोकमत सखी मंचच्यावतीने आणि राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आज ‘माहेर’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळेच सर्व सखींना आज माहेरी आल्याची भावना सुखावणारी होती. माहेरी आल्यावर स्वाभाविकपणे एक मोकळेपणा येतो. त्यामुळेच कुठल्याही सादरीकरणाचा संकोच न बाळगता आपले वय विसरून सखींनी नृत्य, उखाणे, कॅटवॉक, गीत आदी सादर केले. मिळणारी दाद, टाळ्या, प्रशंसा आणि धम्मालच होत असल्याने प्रत्येकीच्या चेहऱ्यावर माहेराचा निरोप घेताना एक अनामिक हुरहूर होती. त्यात दिवसभर ‘नटरंग’ फेम अभिनेत्री सोनाली कुळकर्णी हिचा सहवास लाभल्याने सखी आनंदात होत्या. हा कार्यक्रम बालसदन, काटोल रोड येथे पार पडला. भरगच्च भरलेल्या सभागृहात सोनाली कुळकर्णीशी मनमोकळा संवाद साधत आजचा संपूर्ण दिवसच सखींसाठी अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुळकर्णी आणि राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सारिकाताई ग्वालबंसी, पिंकी चोपडा, सरस्वती सलामे, सोनिया रॉय, कुंदाताई राऊत, मीनाताई बरडे, इंदूताई पुंड, प्रिती शुक्ला, नलिनीताई डवरे, पद्मजा पाटील आदींची उपस्थिती होती.
एकाच वेळी इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या सखींना पाहून सोनाली कुळकर्णीने आश्चर्य व्यक्त केले. तुम्हा सगळ्यांशी भेटताना मला खूप आनंद वाटतोय, असे ती म्हणाली.
याप्रसंगी तिने सखींच्या आग्रहास्तव ‘कोमल काया...’ या तिच्याच गीतावर नृत्य सादर करून सखींची दाद घेतली. त्यानंतर सोनालीच्याच उपस्थितीत विविध स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. उखाणे स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कॅटवॉक, टिकली चेहऱ्यावर लावण्याची स्पर्धा, सर्वाधिक वेणी घालण्याची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांनी या उपक्रमाची रंगत वाढली. जवळपास सर्वच सखींना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याने संपूर्ण सभागृहच दिवसभर उत्साहाच्या भरात संचारले होते. त्यात रंगमंचावर तर नृत्य सुरू होतेच पण सभागृहातल्या सखींनीही नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी सर्वच सखी असल्याने सादरीकरणात मनमोकळेपणा होता. उखाणे स्पर्धाही सर्व वयोगटासाठी खुली होती. यात पतीचे निधन झाले असले तरी उखाणे घेता येईल का? अशी अनेकींनी विचारणा केली. त्यांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आणि त्यांनीही आपल्या पतीची आठवण यानिमित्ताने ताजी केली.
त्यामुळेच सारी मस्ती करतानाही या कार्यक्रमाला एक भावपूर्णताही होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे स्वागत माहेरवाशीणींसारखे करण्यात आल्याने साऱ्याच सखी खूपच आनंदात होत्या.
महिलांच्या प्रगतीसाठी
कटीबद्ध : मुळक
राज्य शासनातला मंत्री म्हणून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आपण केली. यातून महिलांचा विकास होण्यासाठी मदत होते आहे. याशिवाय काही नव्या योजना अमलात आणण्यासाठी आपण प्रामुख्याने पाठपुरावा करतो आहोत. या योजनांचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा.
माहेरसारख्या उपक्रमातून महिलांना मोकळे होण्याची संधी मिळते आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांनाही वाव मिळतो. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
सखींचे माहेरी स्वागत
या कार्यक्रमासाठी सभागृहात प्रवेश करताच केलेल्या स्वागताने सखी भारावून गेल्या. आल्याबरोबर महिलांचे हळदकुंकू लावून स्वागत करण्यात आले. त्यांना गजरा माळण्यात आला. सर्व सखींना बांगड्या भरण्याचाही आग्रह करण्यात आला. नेलपेंट लावण्यात आले. त्यानंतर सर्व सखींना नाश्त्याचा आग्रह झाला. या अनपेक्षित स्वागताने सखींना भरून आले. त्यानंतर प्रत्येकाला आग्रहाने दुपारचे भोजन देण्यात आले. एकीकडे विविध स्पर्धा सुरू असताना मेहंदी काढण्याचीही सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकीचा हात सुबक मेहंदीने सजला होता. निरोप घेताना प्रत्येकीची ओटी भरण्यात आली आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजक नेहा जोशी यांनी केले.